
no images were found
शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार ‘पद्मश्री’ डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जाहीर
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार यंदा पद्मश्री डॉ. प्रतापसिंह गणपतराव जाधव यांना जाहीर करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिंगबर शिर्के यांनी आज, दि. ६ मार्च २०२४ रोजी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. डॉ. जाधव यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी निवड समितीने त्यांची एकमताने निवड केल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठाशी त्यांचे शैक्षणिक ऋणानुबंध हे पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव यांच्यापासून असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कार वितरणाची तारीख आणि प्रमुख अतिथींचे नाव लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
यावेळी पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, कणबरकर पुरस्कार समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बी.ए. खोत, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेसचे संचालक डॉ. सागर डेळेकर, एसयूके-आरडीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश राऊत, मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर आदी उपस्थित होते.