no images were found
नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवा- पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन व जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात पालकमंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्यासह सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला लोकशाही दिन व जनता दरबारात आलेल्या नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले. या लोकशाही दिनाला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, इचलकरंजी आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांचेसह सर्व विभाग प्रमुख, अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री यांनी नागरिकांच्या तक्रारी, समस्या स्विकारून त्यावर अनुपालन वेळेत सादर करण्याबाबत सूचनाही केल्या. या जनता दरबारामधे 314 अर्ज दाखल झाले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढील काळात लोकसभा आचारसंहिता सुरु होत असल्याने जनता दरबार आयोजित केला जाणार नसल्याचे सांगितले. या पूर्वी आवश्यक कार्यवाही करुन सर्व प्रकरणे निकाली काढा अशा सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच त्यांनी उपस्थित शासकिय अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक काळातील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.