
no images were found
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन
कोल्हापूर : उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरीता उद्योग विभागामार्फत जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर यांच्या मार्फत जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषेदचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली दि. 6 मार्च 2024 रोजी सकाळी 10.30 ते सायं. 5.30 या वेळेत हॉटेल पॅव्हिलियन, कोल्हापूर येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यांना विकासाचा केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा उद्देश आहे. या परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणुकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत चर्चा, सामंजस्य करार स्वाक्षरीबाबत कार्यक्रम, इत्यादी बाबींचा समावेश आहे. तसेच जिल्ह्याच्या निर्यातक्षम उत्पादनांचे प्रदर्शन, भौगोलिक मानांकने असलेली उत्पादने, एक जिल्हा एक उत्पादन, जिल्ह्यातील स्थापित औद्योगिक समूह, विविध योजनांचे लाभार्थी यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योग घटकांनी गुंतवणूक परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील यांनी केले आहे.