no images were found
‘प्रिन्स शिवाजी’चे चेअरमन डॉ. के. जी.पाटील यांना डी. लिट. पदवी सेंट्रल अमेरिका विद्यापीठाकडून सन्मानित
कोल्हापूर (प्रतिनिधी): राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेली शतकमहोत्सवी संस्था श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूरचे विद्यमान चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांना सेंट्रल अमेरिका विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लीट.) या पदवीने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विविध संस्थांचे संस्थापक अशी धुरा सांभाळत पाटील हे इ.स. १९८४-८५ पासून ‘प्रिन्स शिवाजी’चे संचालक म्हणून कार्यरत आहेत. सन १९९१-९२ मध्ये ते संस्थेच्या चेअरमनपदी होते. तसेच, सद्ध्या सन २०२१ पासून ते दुसऱ्यांदा संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत.
आपल्या कार्यकाळात पाटील यांनी संस्थेच्या न्यू कॉलेज या शाखेस नॅकचे ए प्लस मानांकन मिळवून देण्यात योगदान देत संस्थेतील विद्यार्थ्यांची वसतिगृहे, स्वच्छतागृहे यांचे नूतनीकरण केले. न्यू पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवीन तंत्रशिक्षण शाखा व कौशल्य विकास कोर्सेस उपलब्ध केले. संस्थेतील विद्यार्थी बस संख्या वाढवली. त्यांच्या नेतृत्वात संस्थेने प्रथमच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकत उचगांव येथील शिक्षण संकुलात फार्मसी कॉलेज (डी. फार्म व बी. फार्म) आणि शिवाजी पेठेत महिलांसाठी फार्मसी काॅलेज (डी. फार्म) सुरू केले.
या कार्याची दखल घेत सेंट्रल अमेरिका विद्यापीठाने आज के. जी. पाटील यांना प्रदान केलेली ही पदवी म्हणजे ‘प्रिन्स शिवाजी’ संस्थेच्या शिरपेचात व कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात एक मानाचा तुरा रोवला गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या सन्मानामुळे गौरवशाली इतिहास असलेल्या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात बहुजन समाजासाठी आणखी भरीव योगदान देण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी, सर्व संचालक, सभासद, कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांसोबत अन्य शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून पाटील यांना अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.