no images were found
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत देशातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेचा शुभारंभ
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज देशातील अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत ५५४ रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पंतप्रधानाच्या हस्ते १५८५ रोड ओवर ब्रिजेस तसेच भूमिगत मार्गिकांच्या निर्मितीसाठी बांधकामाच्या कोनशिलांचे देखील अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा भाग म्हणून मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेतर्फे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तसेच पालकमंत्री दीपक केसरकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित रेल्वे अधिकारी, कर्मचारी व निमंत्रितांना संबोधित करताना राज्यपालांनी भायखळा स्टेशन हे मुंबईतील सर्वात जुन्या स्थानकांपैकी एक असल्याचे सांगितले. देशातील पहिली रेल्वे बोरीबंदरहून सुटल्यावर ठाणे येथे जाताना भायखळा स्टेशनवर थांबली होती असा संदर्भ नमूद करून आज एकाच वेळी अनेक स्टेशनच्या पुनर्विकास प्रकल्पाची सुरुवात होऊन रेल्वेच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात १५८५ ओव्हर ब्रिज आणि अंडर पासेस निर्माण केल्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर होणारे अपघात तसेच वेळेचा व इंधनाचा अपव्यय कमी होईल असे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्रातील ५६ रेल्वे स्थानके आणि १९२ ओव्हर ब्रिज आणि भूमिगत मार्गिकांच्या नूतनीकरणाचा या योजनेत समावेश केल्याबद्दल राज्यपालांनी केंद्राचे आभार मानले. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. अशावेळी देशाची जीवनरेखा असलेली रेल्वे देखील उत्कृष्टच असली पाहिजे, या दृष्टीने अमृत भारत स्टेशन योजना महत्वाची आहे असे राज्यपालांनी सांगितले.
गेल्या दहा वर्षांत भारतातील प्रत्येक राज्य आणि जिल्ह्याला रेल्वेने जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे सांगून राज्यपालांनी रेल्वेचे अभिनंदन केले. यावेळी मुलांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला व निबंध लेखन स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.