
no images were found
वननिवासींसाठी शिवाजी विद्यापीठाचे विस्तार कार्य एखाद्या व्यक्तिच्या हक्कांचे रक्षण म्हणजेच देशाचे संरक्षण- डॉ. श्रीकृष्ण महाजन
खानापूर(प्रतिनिधी) : वननिवासी व्यक्तीच्या व्यक्तिगत हक्काबरोबरच तिचे सामुदायिक हक्कसुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या वैयक्तिक हक्काच्या बरोबर सामुदायिक हक्कांसाठी संघटीत प्रयत्न केले पाहिजेत. हे व्यक्तिगत व सामुदायिक दोन्ही हक्क महत्त्वाचे आहेत. व्यक्ती व समाजाच्या विकासासाठी पूरक व महत्त्वपूर्ण आहेत. एखाद्या व्यक्तिच्या हक्कांचे रक्षण म्हणजे दुसरे काही नसून ते देशाचे संरक्षण आहे असे प्रतिपादन अधिष्ठाता प्रा. श्रीकृष्ण महाजन यांनी वनहक्क दावे अर्ज भरणे मार्गदर्शन शिबीरात केले.
शिवाजी विद्यापीठ सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र आणि खानापूर तालुका अरण्यहक्क संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम, २००६ व सुधारित नियम, २००८ व २०१२ बाबत वन कायदा बाधित लोकांसाठी मार्गदर्शन व वन हक्क दावे
अर्ज भरून घेणेबाबत खानापूर, जिल्हा बेळगावी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबाराच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पुढे बोलतांना ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या या केंद्राच्यावतीने या कायद्याच्या अनुषंगाने वनहक्कदारांना सर्वोतोपरी कायदेशीररित्या व नियमानुसार आवश्यक ते मार्गदर्शन केले जाईल. या प्रसंगी अध्यक्षस्थांनी कॉ. संपत देसाई होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना अविनाश भाले म्हणाले, वन हक्क कायद्यानुसार वैयक्तिक दाव्या बरोबरच सामुदायिक दावेसुद्धा करणे आवश्यक आहे. हे दावे अर्ज बिनचूक व विहित नमुन्यामध्ये वन हक्क समितीद्वारे शासनाकडे सादर करावेत. यासाठी प्रत्येक गावातील वन हक्क समितीने संघटितपणे कृतीशील कार्यक्रमाचे आयोजन करावे.
कार्यक्रमाचे स्वागत महादेव मरगाळे यांनी तर प्रास्ताविक अभिजित सरदेसाई यांनी केले. अध्यक्षीय समारोप करताना कॉ. संपत देसाई म्हणाले, वन हक्काच्या प्रभावी अंमलबजवणीसाठी संघटितपणे शासकीय पातळीवर पाठपुरावा होणे आवश्यक आहे, प्रत्येक गावातील वन हक्क समितीच्या माध्यमातून केला. जाईल. या प्रसंगी त्यासाठी आंदोलनाचीसुद्धा तयारी ठेवावी लागेल. सदर शिबिरात वनहक्क दाव्याचा अर्ज कसा भरावा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आणि काही दावे अर्ज भरून देण्यात आले.
त्यासाठी डॉ. किशोर खिलारे , दत्तात्रय घटूकडे , अभिजीत सरदेसाई , बाळासाहेब पाटील, इत्यादींनी सहकार्य केले. या वनहक्क दावे अर्ज भरणे मार्गदर्शन शिबीरीत खानापूर तालुक्यातील तळावडे, बेडगिरी, देगाव, शिरोली, कान्सुली, अबनाळी इत्यादी गावातील दावेदार बहुसंख्येने उपस्थित होते.