
no images were found
25 जून ते 1 जुलै कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन
कोल्हापूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दि. 25 जून ते 1 जुलै 2023 या कालावधीत “कृषी संजिवनी सप्ताह” आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जास्तीत-जास्त शेतक-यांनी “कृषी संजिवनी सप्ताह”मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय दीवेकर यांनी केले आहे.
खरीप हंगाम 2023 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे यांचे शास्त्रज्ञ, कृषिमित्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. कृषि तंत्रज्ञानातील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करु शकते, यानुषंगाने दि. 25 जून ते 1 जुलै 2023 या कालावधीत प्रत्येक दिवशी महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देवून “कृषी संजीवनी सप्ताह” राबवायवा आहे. कृषि संजीवनी सप्ताहाची सांगता दिनांक 1 जुलै 2023 रोजी स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषी दिन म्हणून साजरा करुन करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातून एकाच दिवशी एकाच मोहिमेची प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाचा तपशील खालील प्रमाणे आहे-
दि. 25 जून 2023 “कृषी पीक तंत्रज्ञान दिवस”, 26 जून 2023- “पौष्टिक अन्न प्रोत्साहन दिन”, 27 जून 2023 “कृषी महिला शेतकरी सन्मान दिन”, 28 जून 2023 “जमीन सुपीकता जागरुकता दिवस” 29 जून 2023 “कृषी क्षेत्राची भावी दिशा, 30 जून 2023 “कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान प्रोत्साहन दिन” व 1 जुलै 2023 “कृषी दिन” सप्ताहाच्या अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावर मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.