
no images were found
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय व आधार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
कोल्हापूर: विवाहाचा खर्च कमी करणे व मागासवर्गीय कुटुंबांना या विवाहावर होणाऱ्या अनाठायी खर्चावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, त्यामुळे मागासवर्गीय घटक सामुहिक विवाह सोहळ्याकडे आकर्षित व्हावे आणि त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था पुढे याव्यात तसेच मागासवर्गीय कुटुंबीयांनाही यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होता यावे या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेवून विवाह करणाऱ्या मागासवर्गीय दांपत्यांसाठी कन्यादान योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय व आधार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.
या योजनेच्या माध्यमातून आधार फाऊंडेशन कोल्हापूर या संस्थेच्या वतीने शाहू ,फुले ,आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १० दांपत्यांच्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन ऐतिहासिक चित्रदुर्ग मठ, दसरा चौक येथे अनिष्ट रुढींना, परंपरांना छेद देत एक अनोख्या पद्धतीने क्रांतिकारी महापुरुषांचे विचार तेवत ठेवण्यासाठी सत्यशोधक पद्धतीने सामुदायिक विवाह सोहळा पार पडला.
महाराष्ट्रात अनुसूचित जाती व नव बौद्धसह विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील वेगवेगळ्या जाती, जमातीतील लोकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा कमी करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजना राबवताना समाजात सामाजिक रुढी व परंपरेचा अजूनही पगडा असल्याचे जाणवते, त्यामुळे विवाह सोहळ्यामध्ये अनाठायी खर्च करणे व त्या प्रसंगी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे हे प्रकार चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. सद्य स्थितीत वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था या सर्व बाबी लक्षात घेऊन समाजातील विविध घटकास सामुहिक विवाह उद्युक्त करीत असतात.
विवाह सोहळ्यात सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी विभागाच्या वतीने क्रांतिकारी महापुरुषांच्या विचारांना दाद देऊन समाजाच्या चाली रुढीला फाटा देऊन सहजीवन सुरु करीत असलेल्या दांपत्यांना शुभेच्छा दिल्या. या नव दांपत्यांनी उचललेले हे पाऊल समाजात निश्चित बदल घडवून आणेल तसेच आपल्या आई-वडिलांना होणारा कर्जाचा बोजा नक्कीच कमी करेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दांपत्याला सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 20 हजार रुपये व विवाहाचे आयोजन करणाऱ्या सामाजिक संस्थेस 4 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला जिल्हा परिषदेच्यावतीने 50 हजार रुपयांचे अनुदान मिळण्याकरिता कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगितले. योजनेच्या अनुषंगाने अशा पद्धतीने सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संघटना, स्वयंसेवी संस्था यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले.
सोहळ्यात अनेक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते तसेच समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक सुरेखा डवर, सचिन कांबळे उपस्थित होते. सामुदायिक विवाह सोहळा पार पडण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या समाज कल्याण निरीक्षक श्रीमती कल्पना पाटील व कार्यालयाचे कर्मचारी तसेच आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय गुदगे,आकाश पट्टण, प्रशांत वाघमारे ,किरण कळीमणी यांचे सहकार्य लाभले.