no images were found
मानसिक समस्यांवर मोफत समुपदेशनासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा
कोल्हापूर : राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम कोल्हापूर यांच्या वतीने मानसिक समस्यांवर मोफत समुपदेशन (24X7) सेवा सुरु केली आहे. बऱ्याचदा आपल्याला काही मानसिक समस्या किंवा लक्षणे जाणवतात परंतु ती समजत नाहीत, सध्या 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षा सुरु आहेत. काही विद्यार्थ्यांना भिती, काळजी, चिंता, अभ्यासात मन न लागणे, परीक्षेची भिती वाटणे, झोप न लागणे, पटकन राग, चिडचिड होणे अशी लक्षणे दिसुन येतात.
तसेच स्किझोफ्रेनिया (संशय येणे, विचित्र वर्तन, कानात आवाज) मेनिया (हर्षवायु, अती उत्साहीपणा), एक कृती वारंवार करणे (विचार कृती अनिवार्य विकृती), नैराश्य (उदासिनता, आत्महत्येचे विचार येणे), व्यसन (मोबाईल, गेम, स्क्रिन टाइम, दारु, तंबाखू, मावा, गुटखा), स्मृतीभ्रंश (विसरभोळेपणा) प्रसुतीपश्चात नैराश्य (PTSD) झोपेच्या संबंधित समस्या, चिंता, भिती, काळजी, एन्युरेसीस (वयाच्या ५ वर्षानंतरही अंथरुणामध्ये लघवी करणे), शाळेत जाण्याची भिती, शाळा बुडविणे, हट्टीपणा, अभ्यासाचा कंटाळा, परीक्षेची भिती वाटणे, स्वमग्न, अतिचंचलपणा, एकलकोंडेपणा, आत्मविश्वास कमी होणे, कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करता न येणे, ताण-तणाव व्यवस्थापन ही लक्षणे भेडसावत असतील तर टेलिमानस टोल फ्री हेल्पलाईन नंबर 14416 किंवा 18008914416 या क्रमांकावर संपर्क साधा किंवा मानसोपचार विभाग, दुसरा मजला, सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर या विभागाशी संपर्क साधा, असे आवाहन सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.निलिमा पाटील यांनी केले आहे