no images were found
गुड्डी मारुती म्हणते, “मी साकारत असलेली दादी फारच मस्त आणि आपल्या नातवाचे लाड करणारी आहे”
काश्मीरच्या सुंदर पार्श्वभूमीवर बेतलेली ‘पश्मीना – धागे मोहब्बत के’ मालिका पश्मीना (ईशा शर्मा) या स्वप्नाळू मुलीची गोष्ट सांगते, जी पहिल्याच भेटीत राघव (निशांत मलकानी) नावाच्या एका व्यावसायिकाच्या प्रेमात पडते. अनेक अडथळे पार करून हे दोन प्रेमी जीव एकमेकांना भेटणार इतक्यात पुन्हा नियतीच्या तडाख्याने ते दुरावतात. या रोमॅंटिक मालिकेने एक वर्षाची झेप घेतली आहे आणि आता मालिकेत नवीन चेहरे आले आहेत. त्यापैकी एक आहे गुड्डी मारुती, जी डॉली या मस्त स्वभावाच्या आजीच्या भूमिकेत दिसत आहे.
लीपनंतर पश्मीनाचा ऋषी (लीनेश मट्टू)शी साखरपुडा होणार आहे आणि ऋषीच्या दादीच्या भूमिकेत गुड्डी मारुती दिसत आहे. आपली व्यक्तिरेखा, काश्मीरमध्ये शूटिंग करण्याचा अनुभव आणि पडद्यावर लीनेश या नातवाशी आपले नाते याविषयी तिने दिलखुलास गप्पा मारल्या.
तुझ्या व्यक्तिरेखेविषयी आम्हाला काही सांग.
मी या मालिकेत दादीची भूमिका करत आहे, जिचे आपल्या नातवावर खूप प्रेम आहे आणि त्याच्यासोबत मौज मस्ती करायला तिला आवडते. आपल्या नातवाला सतावणारी आणि त्याची फिरकी घेऊन मस्ती करणारी ही गंमतीशीर दादी आहे. दादीमुळे या कथानकात थोडी मौज आणि हलकाफुलका विनोद येतो. त्याच बरोबर काही भावुक क्षण देखील येतात. जीवनाचा आस्वाद घेणारी ही व्यक्तिरेखा आहे. संपूर्ण कुटुंबाशी आणि खास करून आपल्या नातवाशी तिचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे.
पश्मीनासाठी शूटिंग करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
मला पश्मीना टीमकडून फोन आला आणि त्यात हा शुभ समाचार मला मिळाला. त्यांनी मला सांगितले की, लवकरच काश्मीरमध्ये शूटिंग होणार आहे, त्यामुळे मला विशेष रस वाटला. शूटिंग उत्तम झाले, बरेचसे काश्मीरमध्येच झाले. त्यानंतर बाकीचे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही मुंबईला आलो. या मालिकेसाठी काश्मीरच्या नयनरम्य ठिकाणी शूटिंग करायला खूप मजा आली. मला खूपच आवडले.
पडद्यावर ऋषी (लीनेश मट्टू)शी तुझे नाते कसे होते?
लीनेश आणि संपूर्ण टीमसोबत काम करायला खूप मजा आली. पडद्याच्या मागे सुद्धा आम्ही खूप धमाल करायचो. जेव्हा शूटिंग असायचे तेव्हा आम्ही सर्व जण आवर्जून एकत्र बसून जेवायचो, खूप गप्पा मारायचो. आमचे एकमेकांशी मस्त नाते जुळले होते. जेव्हा टीम छान असते, तेव्हा सारे काही सुरळीत पार पडते. आणि शूटिंग हा आनंदाचा भाग होतो.
तू केलेल्या इतर मालिकांपेक्षा ही मालिका कशी वेगळी आहे?
या मालिकेचे वेगळेपण हे आहे की ती काश्मीरच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे, आणि प्रत्यक्ष काश्मीरमध्ये शूटिंग केल्यामुळे ती अस्सल वाटते. ही प्रेम आणि पॅशनची कहाणी आहे. यामध्ये काश्मीरचे आणि प्रेमाचे सौंदर्य उलगडून दाखवले आहे. काश्मीरच्या रमणीय पार्श्वभूमीवर यात प्रेम साजरे केले आहे. त्याच्या या अनोख्या सेटिंगमुळे ही मालिका इतर मालिकांमध्ये उठून दिसते. या मालिकेला एक वेगळे सौंदर्य प्राप्त होते. प्रेम आणि काश्मीरचे दैवी सौंदर्य यावर फोकस असल्यामुळे मालिका अनोखी ठरते.
मनोरंजन उद्योगात तुला व्यापक अनुभव असल्यामुळे तू मालिकेतील तरुण कलाकारांना काही सूचना दिल्यास का किंवा त्यांनी तुझ्याकडे कोणता सल्ला मागितला का?
सेटवर आम्ही एकमेकांशी खूप बोलायचो त्यावेळी मी माझे अनुभव शेअर करायचे. मी स्वतःहून त्यांना काही सल्ला दिला नाही पण कुणाला गरज वाटल्यास कोणीही माझ्याकडे येऊन माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकत असे. अभिनय कला आणि या व्यवसायातील वाटचाल याबद्दल बऱ्याचदा ते माझा अभिप्राय आणि माझे विचार काय आहेत हे जाणून घ्यायचे. कलाकारांच्या नव्या पिढीला आपले अनुभव सांगण्याचा आणि त्यांना पाठबळ देण्याचा अनुभव खरोखर धन्यता देणारा होता.