
no images were found
रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करून आयुष्य सुरक्षित ठेवावे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांचे आवाहन
मुंबई: रस्त्यांवरील अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखवण्यासाठी परिवहन विभागामार्फत ‘रस्ता सुरक्षा‘ मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करत वाहने जबाबदारीपूर्वक चालवून आपले व इतरांचे आयुष्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन ‘दिलखुलास‘ आणि ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमातून परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भिमनवार यांनी केले आहे.
परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा मोहिमेच्या माध्यमातून रस्ते वाहतूक व महामार्गांवरील सुरक्षितता तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. रस्ता सुरक्षा ही आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाची बाब आहे. यासाठी स्पीडगनचा वापर करून अतिवेगावर नियंत्रण आणणे, हेल्मेटचा वापर करणे तसेच परिवहन विभागामार्फत लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करणे याबाबत मोहिमेतून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोहिमेची राज्यातील अंमलबजावणी याबाबत ‘दिलखुलास‘ आणि ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमातून आयुक्त श्री.भिमनवार यांनी माहिती दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात श्री. भिमनवार यांची मुलाखत गुरुवार दि. 8, शुक्रवार दि.9 आणि शनिवार दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्युज ऑन ‘एआयआर‘ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत रविवार 11 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक मकरंद वैद्य यांनी ही मुलाखत घेतली आहे.