no images were found
देशाच्या अर्थकारणात बचत गटांचे योगदान – हसन मुश्रीफ
कोल्हापूर : महिला बचत गटांच्या सदस्यांना अत्यंत कमी व्याजदरावर कर्ज, बचत आणि गुंतवणुकीवर परतावा स्वरूपात बँकांकडून मदत मिळते. आर्थिक सहाय्याशिवाय त्यांच्या राहणीमानात सुधारणा करणे शक्य नाही आणि महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांच्या राहणीमानात सुधारणा करतात. या उद्देशाने बांगलादेशात बचत गटांची चळवळ उभी राहिली. या पद्धतीचा स्वीकार सर्व जगाने केला. बचत गटांचे महत्व का आहे ? बचत गटांच्या प्रदर्शनाची गरज का आहे हे त्यांनी सुरु केलेल्या विविध व्यवसायातून दिसून येते. म्हणून बचत गटांचे देशाच्या अर्थकारणात महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन ना. हसन मुश्रीफ मंत्री, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री कोल्हापूर यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियान अंतर्गत कोल्हापूर येथे महिला स्वयंसहाय्यता बचत गटाकडून उत्पादित वस्तूंच्या ताराराणी महोत्सव 2024 या विभागस्तरीय विक्री प्रदर्शनात प्रायव्हेट हायस्कूल ग्राउंडवर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, सहसंचालक एमएसआरएलएम तथा प्रकल्प संचालक डीआरडीए सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, कार्यकारी अभियंता प्रसाद बारटक्के, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोरकर यांचेसह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मुश्रीफ पुढे म्हणाले, 7 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनातून आलेल्या महिलांच्या पदार्थांची व वस्तूंची चांगली विक्री व्हावी. देशातील एकूण लोकसंखेच्या 50 टक्के महिला आहेत. महिलांनी मनावर घेतल्यास व व्यवसाय करायचे ठरविल्यास काय बदल होतो हे या प्रदर्शनावरून दिसून येत आहे. कोल्हापूरची ओळख जागतिक स्तरावर पोहचवणारी कोल्हापुरी चप्पल, सेंद्रिय गूळ, कोल्हापुरी फेटा तसेच दुग्धजन्य पदार्थ आहेत. आता या वस्तूंची विक्री ऑनलाइन होवू लागली आहे. बचत गटांना खऱ्या अर्थाने आपल्या बँकांनी पाठबळ दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात महाराणी ताराराणी व जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन झाली. कार्यक्रमात बचत गटांना अर्थ सहाय्य करून आपले उद्दीष्ट पूर्ण केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच महाआवास मधे चांगले काम करणा-या ग्रामपंचायती, तालुके व अधिकारी यांचाही गौरव यावेळी करण्यात आला. हा महोत्सव दि. 2 फेब्रुवारी पासून 8 फेब्रुवारीपर्यंत सुरु असणार आहे.