no images were found
दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
कोल्हापूर : दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पोलीस परेड ग्राऊंड येथे संपन्न झाल्या. समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर व रोटरी क्लब ऑफ होरायझन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धा झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने पुरस्कृत केल्या होत्या.
कार्यक्रमास जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे, झंवर ग्रुपचे चेअरमन नरेंद्र झंवर, रोटरी क्लब ऑफ होरायझचे पदाधिकारी अॅड. अभयसिंह बिचकर, अॅड. संदीप पवार, सागर बकरे व समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी वर्ग, जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलनाने करण्यात आले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. पोवार यांनी पाहुण्यांचे स्वागत, सत्कार व प्रस्तावना केली. दिव्यांग विद्यार्थ्यांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी व त्यातून नवीन खेळाडू निर्माण व्हावेत या दृष्टीने दरवर्षी जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यातून प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची राज्यपातळीवर निवड होते. त्यामुळे सर्व दिव्यांग खेळाडू या स्पर्धेमध्ये ऊत्साहाने भाग घेतात, असे सांगून त्यांनी दिव्यांग खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन श्री. झंवर यांनी व रोटरी क्लब ऑफ होरायझनचे प्रेसिडेंट अॅड. बिचकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला व क्रीडा गुणांचे कौतुक केले व दिव्यांग खेळांडूना प्रोत्साहन दिले. यावेळी उपस्थित सर्व दिव्यांग खेळाडूंनी क्रीडा प्रतिज्ञा घेतली. यावेळी सर्व शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी संचलन करुन पाहुण्यांना मानवंदना दिली. दिव्यांगांच्या स्पर्धा 8 ते 12, 13 ते 16, 17 ते 21 व 22 ते 25 या वयोगटासाठी घेण्यात आल्या. यामध्ये कर्णबधिर प्रवर्गासाठी धावणे, लांबउडी, गोळाफेक या स्पर्धा, मतिमंद प्रवर्गासाठी धावणे, सॉप्ट बॉल थ्रो, स्पॉट जंप, गोळाफेक, लांबउडी या स्पर्धेचे तसेच पूर्णत: अंध व अंशत: अंध प्रवर्गासाठी धावणे, बुध्दीबळ, पासिंग द बॉल, स्पॉट जंप, गोळाफेक व समिश्र प्रवर्गासाठी धावणे, गोळाफेक, लांबउडी या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. विजेत्या खेळाडूंना प्रशस्तीपत्र व मेडल देवून सत्कार करण्यात आला.
स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व प्रवर्गाच्या मिळून १९ शाळेतील २७५ विद्यार्थी व १३० शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी सर्वांना चहा, नाष्टा व जेवणाची व्यवस्था रोटरी क्लब ऑफ होरायझन कोल्हापूर व झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्यामार्फत करण्यात आली होती. सर्व कार्यक्रम जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. पोवार यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी समाज कल्याण दिव्यांग विभागाच्या वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता साधना कांबळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.