
no images were found
मराठा आरक्षण सर्वेक्षणाचा राज्य मागासवर्ग आयोगाकडून आढावा
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सन 1960 ते 2020 या कालावधीतील जमीन धारणेविषयी तसेच कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्वेक्षणाची आढावा बैठक राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा सहायक नोडल अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार जयवंत पाटील तसेच कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मराठा समाजाच्या सर्वेक्षणात येणाऱ्या अडचणी सदस्य प्रा. तांबे यांनी जाणून घेतल्या. तसेच त्या दूर करण्यासाठी आयोगाकडून तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार व आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील मराठा सर्वेक्षणाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्र वगळून 6 लाख 79 हजार 243 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे नियोजीत आहे. यापैकी 28 जानेवारीपर्यंत एकूण 3 लाख 69 हजार 224 कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती यावेळी सहायक नोडल अधिकारी डॉ. खिलारी यांनी दिली.