no images were found
पोलिस, अग्निशमन, गृहरक्षक, नागरी संरक्षण दलांच्या कर्तव्यनिष्ठेवर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शौर्य आणि सेवा पदकांमुळे शिक्कामोर्तब – अजित पवार
मुंबई :- केंद्रीय गृहमंत्रालयाने वैशिष्ट्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण, वीरतापूर्ण सेवेबद्दल, शौर्य आणि सेवापदके जाहीर केलेल्या राज्यातील पोलिस, अग्निशमन, गृहरक्षक, नागरी संरक्षण दलातील अधिकारी तसेच जवानांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पदकांपैकी महाराष्ट्र पोलिसांना राष्ट्रपतींची चार विशिष्ट सेवा पोलिस पदके, 18 पोलिस शौर्य पदके, 40 गुणवत्तापूर्ण सेवा पदके जाहीर झाली आहेत. गृहरक्षक आणि नागरी संरक्षण दलाला सात आणि सुधारात्मक सेवेसाठी नऊ पदकं मिळाली आहेत. अग्निशमन सेवेतील सहा अधिकाऱ्यांना गुणवत्ता सेवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी जाहीर होणाऱ्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील अधिकारी, जवानांची लक्षणीय संख्या ही बाब राज्यातील पोलिस, गृहरक्षक, नागरी संरक्षण, अग्निशमन दलाच्या कर्तव्यनिष्ठेवर शिक्कामोर्तब करणारी आणि राज्याचा गौरव वाढवणारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी या सर्व दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव केला आहे.