no images were found
आजपासून घरफाळा दंडामध्ये 50 टक्के सवलत योजना सुरु
कोल्हापूर : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केलेस दंडव्याजामध्ये सवलत योजना महापालिकेच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा कालावधी दि. 24 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 अखेर असून निवासी/अनिवासी मिळकतीसाठी 50 टक्के व दि.16 फेब्रुवारी ते 15 मार्च 2024 अखेर निवासी/अनिवासी मिळकतीसाठी 30 टक्के सवलत योजना देण्यात आलेली आहे. यामधील 50 टक्के सवलत योजना आज मंगळवार दि.23 जानेवारी 2024 रोजीपासून सुरु होत आहे.
या सवलत योजनेमध्ये जाहीर केल्या तारखेपासून अंतीम तारखेपर्यत थकबाकीदाराने त्याची मूळ थकबाकी व नोटीस, वॉरटं इत्यादींसह एक रक्कमी रोखीने रक्कम भरलेस दंड व्याजमध्ये सवलत देण्यात येणार आहे. ज्या मिळकत धारकांची मिळकत थकबाकीपोटी सिल करण्यात आली आहे अशा मिळकत धारकांना सुद्धा प्रस्तावित प्रमाणे लाभ देण्यात येणार आहे. ज्या कालावधीसाठी सवलतीचा लाभ घ्यावयाचा आहे, त्या कालावधीत कोणतेही प्रलंबित असलेले अपील पुनर्निरीक्षणासाठी आलेले आवेदन, विविध स्तरावरील न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका प्रलंबित असल्यास ते विना अट मागे घेतली पाहिजे. जर अभय योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अपील, पुनर्निरीक्षणासाठी आवेदन, संदर्भ आवेदन, विविध स्तरावरील न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका दाखल केली तर योजने अंतर्गत संबंधित कालावधीसाठी दिलेल्या सवलती काढून घेण्यात येतील.
मालमत्ता कराची (घरफाळा) रक्कम महानगरपालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्र येथे जमा करण्याची सुविधा आहे. नागरिकांचे सोईकरिता दि.15 मार्च 2024 अखेर दर शनिवारी देखील सुट्टीचे दिवशी नागरी सुविधा केद्रें सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच kolhapurcorporation.gov.in या वेब साईटवर https://web.kolhapurcorporation.gov.in/login यावर Online Payment करण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. थकीत रक्कमेवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतूदीनूसार दरमहा 2 टक्के दंड आकारणी होते. हे टाळण्यासाठी आणि जप्ती, मिळकतींवर बोजा नोंद होणे असे कटू प्रसंग टाळण्यासाठी नागरीकांनी आपली मिळकत कराची थकीत रक्कम या सवलत योजनेच्या कालावधीत भरुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.