
no images were found
सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या 3 आशा स्वयंसेविकेंचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते गौरव
कोल्हापूर : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.1 ते 11 व महापालिकेच्या 2 हॉस्पिटलमार्फत विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येतात. सन 2021-22 मध्ये सर्वोत्कृष्ट कामकाज केलेल्या पहिल्या 3 आशा स्वयंसेविकेंचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सन्मानपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी महापालिकेच्यावतीने आशा दिवस व सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी केशवराव भोसले नाटयगृह येथे आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आला.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यरत आशा स्वयंसेविका यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सद्या महापालिकेकडे 275 आशा स्वयंसेविका कार्यरत असून यांच्यामार्फत शहरात विविध आरोग्य विषयक कार्यक्रमाचे सर्व्हेक्षण करण्यात येते. या आशा स्वयंसेविकेमधून सन 2021-22 मध्ये सर्वोत्कृष्ट कामकाज केलेल्या पहिल्या 3 आशा स्वयंसेविकेंचा गौरव आज करण्यात आला. यामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र.11 मोरे माने नगरच्या सौ.राधीका रमेश आगरे यांचा प्रथम क्रमांक, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रं.2 फिरंगाईकडील सौ.सुप्रिया सचिन कांबळे यांचा द्वितीय क्रमांक व याच केंद्रातील सौ.अनिता जनार्दन कांबळे यांचा तृतीय क्रमांक मिळविला. या सर्वांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आशा स्वयंसेविका यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होवून आपले विविध कलाविष्कार सादर केले. या कार्यक्रमाचे नियोजन शहर कार्यक्रम व्यवस्थापक अमोल महाडिक व शहर लेखा व्यवस्थापक प्रताप पाटील व आरसीएच कार्यालयातील कर्मचा-यांनी केले तर सूत्रसंचालन विजय वणकुंद्रे यांनी केले.
या कार्यक्रमास उपायुक्त शिल्पा दरेकर, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, प्रशासकीय वैद्यकिय अधिकारी डॉ.मंजूश्री रोहिदास, आरसीएच नोडल ऑफिसर डॉ.अमोलकुमार माने, आशा स्वयंसेविका संघटनेचे सचिव प्रविण जाधव, सर्व प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम व सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.