no images were found
गाय दुधाच्या अनुदान योजनेच्या लाभासाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा
कोल्हापूर : जिल्ह्यातील ज्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल, त्यांनी त्यांच्याकडील दुधाळ जनावरांची नोंदणी, अद्यावतीकरण भारत पशुधन पोर्टलवर (NDLM) करण्यासाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. एम. शिंदे यांनी केले आहे.
राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दुध प्रकल्पांमार्फत संकलित होणा-या गाय दुधाकरीता दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये इतके अनुदान देय राहील. सहकारी दूध संघ व खासगी दुध प्रकल्पांमार्फत दुध उत्पादक शेतकऱ्यांना 3.5 Fat 8.5 SNF या गुण प्रतिकरीता किमान 27 रुपये प्रतिलिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहील, त्यानंतर शासनामार्फत 5 रु. प्रतिलिटर बँक खात्यावर थेट वर्ग (DBT) करण्यात यावी, तसेच Fat व SNF 3.5, 8.5 या पेक्षा प्रति पाँईट कमी होणाऱ्या Fat व SNF करीता प्रत्येकी 30 पैसे वजा व प्रति पाँईट वाढीकरीता 30 पैसे वाढ करण्यात यावी. ही योजना दि. 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी आहे.
योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दूध संघ, खासगी दुध प्रकल्प व शेतक-यांसाठी खालीलप्रमाणे अटी व शर्ती आहेत-
राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांनी आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील. दुध उत्पादक शेतक-यांचे बँक खाते, त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी (Ear Tag) लिंक असणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतक-यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक राहील. अनुदान परराज्यातुन संकलीत होणा-या दुधास लागू राहणार नाही. अनुदान योजना केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहील.