no images were found
बाल स्नेह मेळावा व क्रीडा स्पर्धेचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित मुलांचे निरीक्षण, बालगृह, कागल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर शासकीय, स्वयंसेवी संस्था व बाह्य शाळांमधील बालकांसाठी चाचा नेहरु बाल महोत्सवांतर्गत बाल स्नेह मेळावा व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, डी.एड., बी.एड. कॉलेज प्रांगण, सांगाव रोड, कागल येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पी.बी.शिर्के यांनी दिली आहे. तर अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल रेखावार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
बाल महोत्सवांतर्गत खो-खो, कबड्डी, 100 व 200 मीटर धावणे, रिले, गोळाफेक, बुध्दीबळ, चित्रकला, लांबउडी, लंगडी, क्रिकेट, वत्कृत्व, निबंध, हस्ताक्षर स्पर्धा, गायन, नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये बालगृहातील 350 व अन्य महाविद्यालयातील 150 असे साधारण 500 विद्यार्थी या क्रिडा स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी दि कागल एज्युकेशन संस्थेचे सचिव प्रताप ऊर्फ भैय्या माने, बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष,सदस्य, कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पी.बी.शिर्के आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.