no images were found
दूरशिक्षण केंद्राने कौशल्याधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करावेत. – कुलगुरू प्रा.डॉ.शिर्के
कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र समाजातील शिक्षणापासून वंचित असणाऱ्या घटकांना शैक्षणिक क्षेत्रात सामावून घेण्यासाठी प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुरु करावेत असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.दिगंबर शिर्के यांनी केले. ते दूरशिक्षण व ऑनलाइन
शिक्षण केंद्राच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षात सुरु करण्यात येणाऱ्या ऑनलाइन एम.बी.ए अभ्यासक्रमाबाबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी वाणिज्य अधिष्ठाता प्रा.डॉ.श्रीकृष्ण महाजन,उपकुलसचिव डॉ.एस.एम.कुबल,उपकुलसचिव श्री.सी.एस.कोतमिरे,समन्वयक डॉ.कृष्णा पाटील,श्री.वैभव पाटील व ऑनलाइन अभ्यासक्रमाचे सर्व सहा.प्राध्यापक उपस्थित होते.
डॉ.शिर्के म्हणाले, दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या वतीने विद्यार्थी,गृहिणी, कामगार, सैनिक, शेतकरी, उद्योजक बंदीजन पदवी व पदवीवुत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जातात. दूरशिक्षण केंद्राने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणातील रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम समाजातील शिक्षणापासून वंचित असणाऱ्या घटकांना विषयनिहाय सुरु करावेत. जेणेकरून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील हे अभ्यासक्रम मर्यादित कालावधीचे असावेत.
प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम हे समाजातील विविध घटकांच्या दैनंदिन व्यवहारातील जीवनाशी निगडीत असावेत.प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास व ज्ञानावर आधारित कौशल्य विकसित झाली पाहिजेत. येत्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अधिकार मंडळाची मान्यता घेऊन सुरु करावेत. समाजातील सर्व घटकापर्यंत हे प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम पोहचले पाहिजेत. असे कुलगुरू प्रा.डॉ.दिगंबर शिर्के यांनी सूचित केले आहे. यावेळी प्रास्ताविक श्री.वैभव पाटील यांनी केले. तर आभार उपकुलसचिव डॉ एस.एम.कुबल यांनीं मांडले.