no images were found
वेळेचे योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र – रमेश बैस
नाशिक : वेळ हा विद्यार्थ्यांचा चांगला मित्र आहे. वेळेचा कार्यक्षमतेने वापर करून योग्य नियोजन केल्यास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते. ज्ञानाचा विस्तार करण्यासोबतच उद्दिष्टे निश्चित करणे, कौशल्ये सुधारणे आणि खुल्या संधीचा पुरेपूर वापर करण्यासाठी आतापासूनच वेळेचे नियोजन करावे, असा संदेश राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांना दिला.
संदीप विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ राज्यपाल श्री. बैस यांच्या उपस्थितीत आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संदीप विद्यापीठाचे कुलगुरू पंडित नित्यानंद झा, चेअरमन डॉ. संदीप झा, उपकुलगरु डॉ. राजेंद्र सिंन्हा, माजी खासदार प्रभात झा, अलोक झा, आर्यन झा उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, या व्यासपीठावर सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे, त्यांचेदेखील यावेळी विशेष अभिनंदन करतो. अशा कार्यक्रमांमधूनच आजच्या युवा पिढीशी संवाद साधता येतो. देशाचे भविष्य तरुणांच्या हाती आहे. ही तरुण पिढी उद्याच्या भारताचे नेतृत्व करणार असून आज मिळालेल्या पदवीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणार आहे. संदीप विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि विद्यापीठावर देश घडविण्याची मोठी जबाबदारी आहे.