
no images were found
प्रदर्शनाच्या तीन दिवसात ५ कोटीची उलाढाल
कोल्हापूर/प्रतिनिधी: तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला आज तिसऱ्या दिवशी तरुण शेतकरी शालेय विद्यार्थी, शेतकऱ्यांनी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी तुडुंब गर्दी केली होती.तीन दिवसात उच्चांकी तांदळाची विक्री झाली आहे. महिलांनी खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून तीन दिवसात २० लाखांची उलाढाल ही झाली आहे. शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे,व अवजारे यांची नोंदणी ही शेतकऱ्यांनी केली आहे. तीन दिवसात ५ कोटीची उलाढाल झाली आहे.आजरा घनसाळ तांदूळ मोठ्या प्रमाणात विक्री झाली असून मागणी वाढत चालली आहे. आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने आणखी शेतकऱ्यांच्या तांदळाची विक्री होणार आहे.आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे तरी शेतकऱ्यांनी भेट देण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “सतेज कृषी प्रदर्शन चार दिवस आयोजन करण्यात आले आहे.२२ डिसेंबर पासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी रविवार सुट्टी होती त्यामुळे लोकांनी व कोल्हापूरसह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटक,इचलकरंजी व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी तुडुंब गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी तपोवन मैदानावर गर्दी केली होती.
आज २५ डिसेंबर रोजी आमदार पी.एन. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी ४ वाजता प्रदर्शनाचा सांगता समारंभ होणार आहे. यावेळी आमदार सतेज पाटील, डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी.पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार श्रीमती जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर विश्वस्त तेजस पाटील यांची उपस्थिती राहणार आहेत.
सतेज कृषी प्रदर्शन यावर्षीचे प्रदर्शनाचे पाचवे वर्ष असून अडीचशे हून अधिक स्टॉल, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभागी झाल्या आहेत.त्या कंपन्यांची उत्पादने, अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते प्रदर्शनात शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, विदेशी भाजीपाला, कोल्हापूर जिल्ह्यात पिकविण्यात आलेला भाजीपाला, फुले, साडेपाच फूट लांब शिंग असलेली १० लिटर दुध देणारी पंढरपुरी म्हैस, राजा नावाचा जाफराबादी रेडा, कमी उंचीची ४ वर्षे वयाची कुंगनूर जातीची गाय, अमेरिकन सिल्क जातीची पायावर केस असलेली कोंबडी, ७० हजार रुपये किंमतीचा ९७ किलोचा बोकड, माडग्याळ मेंढा, पाहण्यासाठी गर्दी केली होती.
याचबरोबर फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश असल्याने याठिकाणी गर्दी ही लहान मुलांसह आबालवृद्ध आणि शेतकरी करत आहेत.प्रदर्शनामध्ये खाद्य महोत्सव भरविण्यात आला असून याठिकाणी कोल्हापूरकर आस्वाद घेत आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जात आहे. तर पाणलोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन,ठिबक सिंचन, गांडूळ खत युनिट याचीही माहिती दिली जात आहे.
प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव भरविण्यात आला असून तांदळाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी,हात सडीचा अशा नमुन्यांचा तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे.ज्याची विक्री ही होत आहे.शिवाय राधानगरी येथील घरगुती हळद,व अन्य शेतकरी यांची हळद,मसाले,सेंद्रिय गूळ नाचणी,उडीद, विविध फळे पेरू,मसाले, विविध साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यांची खरेदी होत आहे. प्रशासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागा अंतर्गत या ठिकाणी शेततळे उभा करण्यात आले आहे. याचबरोबर प्रदर्शनामध्ये जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने तुती बने रेशीम आळी,त्यापासून रेशीम निर्मिती पहावयास मिळत आहे.प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणत गुळाची विक्री झाली सेंद्रिय गूळ खरेदी करण्यावर लोकांनी अधिक भर दिला आहे.
डॉ. अशोक पिसाळ यांनी टंचाई सदृश स्थितीत पिकांसाठी पाणी व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.डॉ. योगेश बन यांनी पौष्टिक भरड धान्य उत्पादन याची माहिती दिली.सत्यजित भोसले यांनी प्लास्टिक कल्चर तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजावून सांगितले.भरत मरजे प्रगतशील शेतकरी यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.यावेळी शेतकरी सुरेखा पाटील यांनी शेतीतील महिलांचे महत्त्व विशद केले.
प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्पस्पर्धा, खाद्य महोत्सव स्पर्धा,जनावरे गटनिहाय स्पर्धा या घेण्यात आल्या आहेत. याचबरोबर काही शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीने उत्कृष्ट शेतकऱ्यांची पशुस्पर्धांची निवड करण्यात आली आहे. त्यांना बक्षिसे आज होणाऱ्या समारोप समारंभात दिली जाणार आहेत.आज तपोवन मैदानावर महाराष्ट्राच्या लावणीचा बहारदार कार्यक्रम झाला.
सतेज कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात तीन दिवसात विक्री झालेला शेतमाल :
1) सेंद्रीय गूळ : 3000kg
2) इंद्रायणी तांदूळ : 4700kg
3) आजरा घनसाळ 8500 kg
4) सेंद्रीय हळद : 1410 kg
5) जोंधळा जिरगा तांदूळ : 600 kg
6) नाचणी : 1200kg
7) विविध बी.बियाणे 500 kg