no images were found
आईच्या गावात मराठीत बोल’ चित्रपटाच्या धमाकेदार टिजरने वेधलं लक्ष
थ्री इडियट्स फेम ओमी वैद्य मोठ्या दणक्यात मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. टीएटीजी फिल्म्स एलएलपीची प्रस्तुती असलेला “आईच्या गावात मराठीत बोल” ह्या चित्रपटाची प्रदर्शनाआधीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटाचा टिजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टिजर पाहणाऱ्या सगळ्यांची नुसती हसून पुरेवाट होत आहे. सगळ्या कलाकारांचं विनोदाचं टायमिंग इतकं उत्तम जुळून आलंय की चित्रपटाच्या 19 जानेवारी,2024 या रिलीज डेटची सगळे वाट पाहत आहेत.
ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटीच ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने ‘चतुर’ या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपला असा चाहता वर्ग याआधीच निर्माण केला आहे. आणि आता मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्याचे मोठं चॅलेंज त्याने स्वीकारलं आहे. पहिल्याच मराठी सिनेमात तो दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडल्याचे टिजर मधून दिसत आहे. टिजरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबतचा त्याचा वावर एकदम सहज वाटतो आहे.ओमी आणि त्याच्या संचातले सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील याबाबत शंका वाटत नाही. चित्रपटाचा नायक समर (ओमी वैद्य), अमेरिकेतून भारतात आल्यावर अनपेक्षित वळणांचा प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. वाक्यागणिक मराठीचा अपभ्रंश करणारा , धेडगुजरी बोलणाऱ्या समरची कायापालट होऊ शकते का ? साता समुद्रापार वसलेली आपल्या महाराष्ट्राची मुलं बाळं एक आधुनिक “मराठीपण” जोपासू शकतील काय ? ह्या सगळ्या प्रश्ननांची उत्तरं समरला गवसतातच ,पण प्रेम, कुटुंब, स्वतःची पाळंमुळं ह्याचा खरा अर्थही जसा समरला सापडतो तसाच त्याचा हा प्रवास प्रेक्षकांनाही भावेल.
या चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान, डॉ. जलदीप दलूत , पीट टॉरमे, नंदिनी मिनॉशे, समिया अश्रफ, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, माँटी आणि तनु पांडे, संतोष गोविंदाराजू, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, जसलीन अहलुवालिया राजन वासुदेवन,राजीव आणि शीतल शाह,संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे, उदय कुमार यांनी केली आहे. अमेरिकेत जन्मलेला पण महाराष्ट्रबद्दल नितांत आदर असणारा ओमी वैद्य आणि अमेरिकेत राहत असून मराठीचा वसा जोपासणारी अमृता हर्डीकर ह्यांनी अमेरिकेतच ह्या चित्रपटाची कथा,पटकथा आणि संवाद लिहून चित्रपटाची आखणी सुरु केली. अमेरिकेतूंनच त्यांनी दोघांनी संचबांधणी सुरु केली.सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली आहे.संगीत आणि पार्श्वसंगीत – अविनाश विश्वजीत यांनी दिलेले आहे तसेच या चित्रपटाचे संकलन मयूर हरदास आणि ओमी वैद्य यांनी केले आहे .
‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य , संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार,सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगळेकर असे कसलेले कलाकार आहेत. ओमी वैद्य पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करतोय आणि सोने पे सुहागा म्हणजे दिग्दर्शक म्हणूनही त्याचा हा पहिलाच चित्रपट असल्याने रसिक प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.