
no images were found
प्रादेशिक पक्षांशी आघाडी का नाही – राहुल गांधी
मागच्या महिन्यात झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेसचा तीन राज्यात मोठा पराभव झाला. तर तेलंगणा या एकाच राज्यात काँग्रेसला सत्ता मिळविता आली. काँग्रेसच्या आज संपन्न झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या निकालाचे पडसाद उमटले. तीन राज्यात काँग्रेसचा पराभव का झाला? यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपाचा पराभव करायचा असेल तर प्रादेशिक पक्षांसह आघाडी करण्याचा विचार मांडला. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह समितीमधील ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. खरगे यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी २०२४ च्या निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधकांची एकजूट होणे गरजेचे असल्याचे म्हटले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींनी बैठकीत उपस्थित नेत्यांना प्रश्न विचारला की, भाजपाला पराभूत करण्यासाठी त्या त्या राज्यातील छो्टया छोट्या पक्षांसह आघाडी करण्यास काय हरकत आहे? भाजपाला छोट्या पक्षांचे मतदान मिळाल्यामुळे त्यांचा विजय झाला, असा काँग्रेसचा अंदाज आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करा, असा सल्ला राहुल गांधी यांनी बैठकीत दिला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मध्य प्रदेशची निवडणूक लढविली. मात्र काँग्रेसचा मोठा पराभव झाला. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रचारादरम्यान समाजवादी पक्षाचा आघाडीचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. तसेच त्यांनी सपाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री आणि चार वेळा खासदारकी भूषविलेल्या अखिलेश यादव यांचा उल्लेख ‘अखिलेश-वखिलेश असा केला होता. यामुळे मध्य प्रदेशच नाही तर इतर राज्यातील ओबीसी मतांवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला, असे सांगितले जाते.
राहुल गांधी यांनी बैठकीत कुणाचेही नाव न घेता मध्य प्रदेशचा संदर्भ दिला. काँग्रेसने इतर प्रादेशिक पक्षांसह आघाडी करण्याची तयारी ठेवली पाहीजे. भाजपाविरोधात लढाई लढत असताना समाजातील प्रत्येक घटकाचे मत महत्त्वाचे आहे. पराभूत झालेल्या तीन राज्यात पक्षान व्यवस्थित प्रचार केला नाही, असेही राहुल गांधी यावेळी सांगितले. तेलंगणातील प्रचाराचे त्यांनी कौतुक केले. या प्रचारामुळे तिथे मोठा विजय झाला असल्याचे गांधी म्हणाले.
मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी यांच्या विचारांशी सहमती दर्शविली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पक्षाचे व्यापक हित पाहता, प्रादेशिक पक्षासाठी काही जागा सोडणे गैर नाही, असेही खरगे म्हणाले. तसेच खरगे यांनी सर्व पक्षाला संदेश देताना सांगितले की, भाजपाप्रणीत एनडीएशी लढण्यासाठी काँग्रेस पक्षाला इंडिया आघाडीसह एकत्र येऊन लढा द्यावा लागेल.