Home राजकीय “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय माझा होता”-देवेंद्र फडणवीस

“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय माझा होता”-देवेंद्र फडणवीस

4 second read
0
0
35

no images were found

“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय माझा होता”-देवेंद्र फडणवीस

गेल्या चार वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. आधी सेना-भाजपाची तुटलेली युती, नंतर महाविकास आघाडीची स्थापना, फडणवीस-अजित पवारांचा शपथविधी, कोसळलेलं सरकार, उद्धव ठाकरेंचा शपथविधी या घडामोडींनंतर गेल्या वर्षी शिवसेनेत बंडखोरी होऊन एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळच्या घडामोडींवर अजूनही राजकीय चर्चा, दावे-प्रतिदावे केले जात असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय आपला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात सध्याच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा स्तर खालावत असल्याचं सांगताना त्यांनी संजय राऊतांवर नाव न घेता टीका केली.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा स्तर खाली जात असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. “हा साथीचा रोग आहे. हा एकाला झाला की दुसऱ्याला होतो. हा करोनासारखाच आहे. मूळ विषाणू जोपर्यंत आपण संपवणार नाही, तोपर्यंत हे थांबणार नाही. तो मूळ विषाणू कुठे आहे हे सगळ्यांना माहिती आहे. रोज सकाळी हा विषाणू पसरवण्याचं काम माध्यमांकडून केलं जातं. आमचं अँटिव्हायरसचं काम चालूच आहे. असा व्हायरस फार काळ चालू शकत नाही. लोक आत्ताही कंटाळलेच आहेत. एक दिवस लोक त्यांना पाहणंच बंद करतील. मग तेव्हा माध्यमंही त्यांना दाखवणं बंद करतील. माध्यमांनी दाखवणं बंद केलं की ते बोलणंही बंद करतात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री करून पक्षानं अपमान केल्याच्या आरोपांवरही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं. “असे आरोप झाले की माझं मनोरंजन होतं. मी वारंवार हे सांगितलं आहे. एक तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं हा निर्णय माझा होता. हा काही पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलेला निर्णय नाही. मी प्रस्ताव मांडला होता. वरिष्ठांनी कालांतराने तो मान्य केला. मी मुख्यंमत्री होणार नाही हे मला पहिल्या दिवसापासून माहिती होतं. पण मी उपमुख्यमंत्री होईन हे शेवटच्या दिवसापर्यंत मला माहिती नव्हतं. माझ्या पक्षानं मला सांगितलं की सरकार चालवायचं आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. हा माझा सन्मानच आहे”, असं ते म्हणाले.
“माझ्या पक्षानं उद्या मला सांगितलं की तुमचं काम संपलं, आता तुम्ही घरी बसा, तर मी घरी बसेन. कारण मी जे काही आहे, ते माझ्या पक्षामुळे आहे. माझ्या नावामागचं भाजपा काढून टाकलं तर मी शून्य आहे. त्यामुळे पक्ष जे सांगेल, ते मी करेन”, असंही फडणवीसांनी नमूद केलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या चर्चांना मध्यंतरी उधाण आलं होतं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. “पक्षाला जेव्हा वाटेल, तेव्हा मला बोलवतील. पण बाकी ज्यांना वाटतंय की ‘बला’ टळली पाहिजे, त्यांना मी सांगेन, तुम्ही देव पाण्यात ठेवून बसलात, तरी ‘बला’ काही टळत नाही”, अशा शब्दांत हिंदीतील शब्दप्रयोगाचा वापर करून फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला.

Load More Related Articles

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …