no images were found
मास कम्युनिकेशनच्या ‘मीडिया स्प्रेक्ट्रम’चे प्रकाशन
कोल्हापूर( प्रतिनिधी):शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर आधारित तयार केलेल्या मीडिया स्पेक्ट्रम या विशेषांकाचे प्रकाशन कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते झाले. व्यवस्थापन परिषद हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, उपकुलसचिव गजानन पळसे, डॉ. प्रसाद ठाकूर आदी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग नोंदवला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांशी चर्चा करून माहिती संकलित केली होती. याशिवाय काही मास्टर क्लासेसमध्येही विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्व माहितीचे संकलन असलेला मीडिया स्पेक्ट्रम हा विशेषांक विद्यार्थ्यांनी तयार केला. या अंकाचे संपादन डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.
अंकाच्या प्रकाशनावेळी कुलगुरू प्रा. शिर्के म्हणाले, मास कम्युनिकेशन कोर्स खूप महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून जनसामान्यांशी संवाद साधला पाहिजे. मुद्रीत माध्यमांबरोबरच इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. माध्यमांचा विस्तार आणि तंत्रज्ञान बदलत असल्याने विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने कौशल्ये आत्मसात करावीत.
प्र-कुलगरू प्रा. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन माहिती घेणे आवश्यक आहे. यातून ज्ञान अधिक चांगल्या पद्धतीने घेता येते. यापुढील काळातही विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फिल्ड रिपोर्टिंग करतील. चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या साईसिमरन घाशी, मेलीना कालिचुर्ण, सुरज कांबळे, अथर्व यज्ञोपवित, दिव्या कांबळे, सचिन बनसोडे आदी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले.
विशेषांकाची वैशिष्ट्ये
चित्रपट महोत्सवात प्रत्यक्ष सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांनी आपले जिवंत अनुभव अंकात मांडले आहेत. देशभरातून आलेल्या काही निवडक सहभागींशी विद्यार्थ्यांनी संवाद साधून त्यांचे चित्रपट महोत्सवाबद्दचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मास कम्युनिकेशनची मॉरिशस येथील विद्यार्थीनी मेलिना कालिचुर्ण हिने स्थानिक खाद्य संस्कृती तसेच पर्यटनाबाबत आपले अनुभव लिहिले आहेत. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांत हा अंक प्रकाशित करण्यात आला आहे.