
no images were found
जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोफत मार्गदर्शन – राहुल रेखावार
कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन शिबिर’ दरमहा 5 तारखेला आयोजन करण्यात येत आहे. मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात सांगली जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी अजय शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. अधिकाधिक विद्यार्थी व परीक्षार्थ्यांनी उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या या मार्गदर्शन शिबिरात स्पर्धा परीक्षेची तयारी व याबाबत आवश्यक अन्य माहिती या व्याख्यानांतून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागातील संधी, त्यासाठी होणाऱ्या परीक्षा, आवश्यक पात्रता, यासाठीची तयारी आदींबाबत मार्गदर्शन करत आहेत. यासह आपल्या अनुभवाद्वारे स्पर्धा परीक्षेची प्राथमिक तयारी व अभ्यासाची सुरुवात, परीक्षेची तयारी, अभ्यासाची पध्दत, अभ्यासाचे नियोजन आदी विविध पातळींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दर महिन्यात विविध अधिकारी या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना माहिती देत आहेत.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आव्हानेही वाढत आहेत. बदलत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी विद्यार्थी अपार कष्ट घेतात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, त्याचे महत्व समजावे तसेच यातून महाविद्यालयीन विद्यार्थीही स्पर्धा परीक्षांकडे वळण्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना लाभ होईल, अशी माहिती करवीरचे उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक यांनी दिली आहे.