
no images were found
नीरज चोप्राने पुन्हा रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय
नीरज चोप्राने गुरुवारी ज्यूरिखमध्ये डायमंड लीग फायनलमध्ये प्रथम स्थान मिळवून इतिहास रचला आहे. डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय ठरला आहे. झुरिचमध्ये झालेल्या फायनलमध्ये नीरज चोप्राने 88.44 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत नीरज चोप्राने चेक प्रजासत्ताकच्या याकुब वाडलेज आणि जर्मनीच्या जूलियन वेबर यांचा पराभव केला. वाडलेज 86.94 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरा आणि जर्मनीचा वेबर (83.73) तिसरा आला.
नीरज चोप्रा लुसाने मध्ये डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला होता. दरम्यान नीरजने जुलै महिन्यात अमेरिकेतील जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. मात्र याचस्पर्धेतदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला बर्मिंगहममधील राष्ट्रकुल स्पर्धेला मुकावे लागले होते. भारताच्या 24 वर्षाच्या नीरज चोप्राने या दुखापतीतून सावरत 26 जुलैला झालेल्या लुसानेमध्ये पहिल्या प्रयत्नातच 89.08 मीटर भालाफेक करत टायटल आपल्या नावावर केले. त्यावेळी नीरजवर दुखापतीचा काही परिणाम झालाय असे वाटत नव्हते. नीरज चोप्रा 2017 आणि 2018 मध्ये डायमंड लीग फायनल्ससाठी पात्र झाला होता. तो 2017 ला सातव्या तर 2018 मध्ये चौथ्या स्थानावर राहिला होता.