no images were found
जालनामध्ये राजेश टोपे यांच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला
जालना : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर अज्ञात लोकांकडून जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली दगडफेक करण्यात आलीय. या हल्ल्यात राजेश टोपे यांच्या गाडीची समोरची काच फुटली आहे.
मराठवाडा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे. जालन्यात सध्या जिल्हा बँक निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. त्यानिमित्तानं राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते. राजेश टोपे यांची गाडी जिल्हा बँकेच्या इमारतीजवळ उभी असताना त्या ठिकाणी त्यांच्या गाडीच्या समोरील भागावर दगडफेक करण्यात आली. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दाखल झाले आहेत. टोपे यांच्या गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली देखील आढळून आली आहे.राजेश टोपे यांच्या गाडीवर नेमका कुणी हल्ला केला हे अद्याप समोर आलेलं नाही. अज्ञात व्यक्ती नेमक्या कोण होत्या हे अद्याप समोर आलेलं नाही.
राजेश टोपे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. जालन्यात सध्या जिल्हा बँक निवडणूक, आरक्षण आंदोलनामुळं वातावरण संवेदनशील झालेलं आहे. अशा पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांच्या गाडीची तोडफोड नेमकी कुणी केली आणि का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही