
no images were found
युवा संशोधकांनी परिषदांमधील नाविन्यपूर्ण ज्ञानाचा लाभ उठवावा डॉ. सुधींद्रा रायप्रोल
कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात झालेल्या दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेची सांगता डॉ. सुधींद्रा रायप्रोल (यूजीसी- सीएसआर, मुंबई) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
ते म्हणाले की, अशा प्रकारच्या राष्ट्रीय परिषदांमध्ये युवा संशोधकांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा व जगभरात होत असलेल्या नवनवीन संधींची माहिती करून घ्यावी.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठ रिसर्च, डेव्हलपमेंट फाउंडेशन (सेक्शन ८ कंपनी) यांच्या विद्यमाने प्रा. बी. एन. थोरात (आय. सी. टी., मुंबई) यांचे इनोव्हेशन, इंक्युबॅशन, एंट्र्रप्रनोरशिप आणि स्टार्टअप इकोसिस्टिम याविषयावर व्याख्यान झाले. त्यांनी त्यासंबंधी विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.
तसेच, डॉ. नीतू झा (आय. सी. टी., मुंबई) यांनी कार्बन पदार्थांच्या सहाय्याने पाणी शुद्धीकरणासाठीच्या यंत्रांची माहिती दिली. तसेच, डॉ. एम. व्ही. कुलकर्णी सी- मेट, पुणे यांनी पॉलिमर व त्यांचे कंपोझिट यांचे महत्त्व व्यवहारातील उदाहरणांसह विषद केले.
परिषदेत झालेल्या मौखिक सादरीकरणामध्ये ऋतुजा गंभीर यांनी प्रथम, सुशांत पाटील यांनी द्वितीय, तर केतन कुमार गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच, पोस्टर सादरीकरणामध्ये एन. एच. देहकोर्डी यांनी प्रथम, हर्षदा लोखंडे यांनी द्वितीय, तर ऋतुजा गुरव यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच यावेळी विविध परीक्षकांचा सत्कार करण्यात आला.
संयोजक डॉ. एन. एल. तरवाळ यांनी परिषदेतील घडामोडींचा आढावा सादर केला. विभागप्रमुख प्रा. के. वाय. राजपुरे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. याप्रसंगी वरिष्ठ प्राध्यापक डॉ. विजय फुलारी, प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे, सेक्रेटरी डॉ. आर. एस. व्हटकर यांसह अनेक संशोधक विद्यार्थी- विद्यार्थिनी, वैज्ञानिक, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. एस. एस. पाटील यांनी मानले तर, सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले.