no images were found
असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक- उद्धव ठाकरें
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाळ्यात पडलेला दुष्काळ आणि आता अवेळी होणारा पाऊस यामुळे शेतीचे आणि बळीराजाचे मोठे नुकसान होत आहे. या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश जिल्हास्तरावर घेण्यात आले आहेत. मात्र दुष्काळी भागात पंचनामे होऊन बरेच ठिकाणी आर्थिक मदत मिळालेली नसल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी राजस्थान आणि तेलंगणामध्ये प्रचारासाठी गेलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरेंनी जहरी टीका केली.
“माझ्या राज्यातील शेतकरी विविध समस्यांशी झुंजत आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर अस्मानी संकटांच्या तडाख्याने शेतकरी त्रस्त आहे. असे असताना जो माणूस स्वत:च्या घराची (राज्यातील समस्यांची) काळजी न करता बेपर्वाईने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जात असेल तर असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे. अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा किंवा मी राज्याचा महत्त्वाचा भाग आहे हे बोलण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. कांद्याचे आणि द्राक्षाचे नुकसान झाले आहे. मात्र आजचे मुख्यमंत्री स्वच घर सोडून दुसऱ्याचे घर धुंडाळत आहेत. दुसऱ्यांचे घर धुंडाळणारे हे भुरटे शेतकऱ्यांना काय न्याय देणार? शेतीमध्ये मुख्यमंत्री हेलीकॉप्टरने जातात. इतर शेतकऱ्यांचीही तेवढीच प्रगती झाली पाहिजे असे माझे मत आहे. भाजप सध्या प्रचारांमधून रेवड्या उडवत आहेत. इतर राज्यांवर रेवड्या वाटणारे महाराष्ट्राला कधी देणार?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा मिळाला नाही? पीकविम्यावरुन शेतकऱ्यांची थट्टा केल्याचाही आरोप त्यांनी केला.