no images were found
शरद पवारांनी दिला नैना प्रकल्पाच्या विरोधाला पाठिंबा !
पनवेल, पेण आणि उरण तालुक्यांत होऊ घातलेल्या नैना प्रकल्पाच्या विरोधात येथील ग्रामस्थांनी उग्र आंदोलन सुरू केले आहे. ६ डिसेंबरला सिडकोविरोधात काही प्रकल्पग्रस्त नेते मंडळी बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. सोमवारी (ता. २७) नैना प्रकल्पग्रस्त नेत्यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना आंदोलनाची माहिती व शेतकऱ्यांच्या मागण्या सांगण्यात आल्या. त्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे गावठाण विस्तार समितीचे अध्यक्ष अनिल ढवळे यांनी सांगितले.
सिडकोतर्फे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या २५ किलोमीटरच्या परिघात नैना प्रकल्प राबवला जात आहे. पनवेल, उरण आणि पेण तालुक्यातील गावे बाधित होत आहेत. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन सिडकोतर्फे जी मोबदल्यात जमीन दिली जात आहे, त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.सिडको शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करीत नसल्याने आता शेतकऱ्यांनी थेट नैना रद्द करण्याची हाक दिली आहे. त्यासाठी शिवकर गावचे सरपंच अनिल ढवळे यांच्यासोबत आणखी तीन जण ६ डिसेंबरपासून मुंबई-गोवा महामार्गावरील तुरमाळे गावाजवळ बेमुदत उपोषण करणार आहेत. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ढवळे यांच्यासह कामगार नेते ॲड. सुरेश ठाकूर, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील, नगरसेवक रवींद्र भगत आदींनी पवार यांची भेट घेतली.
भेटीदरम्यान नैना प्रकल्पासह भूमिपुत्रांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी बांधलेली रहिवासी, वाणिज्य वापरातील बांधकामे जेथे आहेत तेथे नियमित करावीत, साडेबारा टक्के योजनेमार्फत प्राप्त भूखंडातून बेकायदा कपात पाऊणे चार टक्के भूखंड शेतकऱ्यांना परत करावेत.विरार-अलिबाग कॉरिडोर, लॉजिस्टि्स पार्क, महाऊर्जा प्रकल्प आदी महत्त्वाच्या समस्यांवरही चर्चा झाली. याप्रसंगी भूमिपुत्रांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन पवार यांनी दिल्याचे ढवळे यांनी सांगितले.