
no images were found
भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी दिली, रोहित पवारांच्या आरोपावर भुजबळांचं उत्तर
ओबीसी नेत्यांनी आपला विरोध दर्शवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी जालन्यातल्या आंबड येथे ओबीसी एल्गार सभा घेतली. या सभेत केलेल्या भाषणात भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर सडकून टीका केली. भुजबळ हे मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर वैयक्तिक टीकादेखील करू लागले आहेत.
ओबीसी एल्गार सभेतील छगन भुजबळांच्या भाषणावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, भुजबळांच्या भाषणाची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिली होती.
रोहित पवार यांच्या टीकेला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. भुजबळ यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी भुजबळ म्हणाले, मला कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी शरद पवार स्क्रिप्ट देत नव्हते, नाअजित पवार ना फडणवीस, ना एकनाथ शिंदे मला कोणीच स्क्रिप्ट देत नाही. गेल्या ३५ वर्षांपासून मी हे काम करत आहे. मी ओबीसींचं काम हाती घेतलं आहे आणि हेच माझं स्क्रिप्ट आहे.
छगन भुजबळ म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हेच माझं स्क्रिप्ट आहे. मंडल आयोगाचा अहवाल हे माझं स्क्रिप्ट आहे. बहुजन समाज, ओबीसी समाजाचं स्क्रिप्ट तेच माझं स्क्रिप्ट.