no images were found
महिला बचत गटांच्या उत्पादनांचा दिवाळी मेळावा नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी
कोल्हापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम ) कोल्हापूर मार्फत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत 3 दिवशीय दिवाळी मेळावा सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत दैवज्ञ बोर्डिंग, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देवून बचल गटातील महिलांनी बनवलेल्या उत्पादनांची खरेदी करावी. असे आवाहन माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांनी केले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव, विभागीय कृषी व पणन विभागाचे विभागीय सरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक (बँक ऑफ इंडिया) गणेश गोडसे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) शिल्पा पाटील, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या प्रदर्शनात माविम स्थापित एकूण 40 बचत गटांचे स्टाँल सहभागी झाले आहेत. यामध्ये दिवाळी निमित्त बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेले कोल्हापुरी मसाले, चहापूड, मातीची नक्षीदार भांडी, विविध प्रकारच्या साड्या, आकाशदिवे, आकाश कंदील, लहान मुलांची खेळणी, अगरबत्ती, दिवाळीचे फराळ, पणत्या, दिवे, ज्वेलरी व महिला व लहान मुलांचे कपडे, नाचणी बिस्किटे, रोट, हर्बल प्रोडक्ट, चकली, बाकरवडी तसेच खाद्यपदार्थांचे निवडक स्टॉल लावण्यात आले आहेत. बचत गटातील महिलांना उद्योग व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याकरिता विविध शासकीय विभागांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याठिकाणी महिलांना आपण तयार केलेल्या वस्तू विकण्याबाबत तसेच संभाषण कौशल्याबाबत माहिती देण्यात येत आहे. तसेच महिलांच्या कला गुणांना वाव देणारे संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. दिवाळी मेळाव्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी, जेणेकरुन बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री होवून त्यांची आर्थिकदृष्ट्या वाढ होईल, असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी श्री. कांबळे यांनी केले आहे.