no images were found
प्रशासनाने स्थानिक पातळीवरच लोकांचे प्रश्न सोडवावेत – हसन मुश्रीफ
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारात नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवत 910 नागकिरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून 337 हून अधिक अर्ज दाखल केले. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला स्थानिक स्तरावरच नागरिकांच्या समस्या, प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या. सर्वसामान्य नागरिक, जेष्ठ, वृद्ध यांनी आपल्या अडचणीबाबतच्या भावना पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी लोकांच्या समस्या वाढत असून याबाबत शासकीय विभागांनी तातडीने महिन्याच्या आत अर्जावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. नागरिकांना पून्हा पुन्हा तक्रारी घेवून मुख्यालयात येण्याची वेळ पडू नये. तसेच जे अर्ज निकाली निघणार नाहीत त्याबाबत अर्जदारांना लेखी स्वरूपात नियम, धोरण याबाबत मुद्दे लिहून उत्तरे कळवावीत असे सांगितले. यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरीक्त महानगरपालिका आयुक्त कोल्हापूर केशव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, छत्रपती प्रमिलाताई राजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रकाश गुरव, तहसीलदार सुर्यकांत पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामार्फत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार आयोजित करण्यात येतो. जिल्हयातील ग्रामीण भागापासून शहरी भागातील 337 हून अधिक जणांनी आपल्या अडचणी अर्जाद्वारे सादर केल्या. या मध्ये प्रामुख्याने महसूल 23, जिल्हा परिषद 39, कोल्हापूर महानगपालिका 33, पोलीस विभाग 21 व सहकारी संस्था 13 या प्रमुख विभागाचा समावेश आहे. यावेळी पालकमंत्री यांनी प्रत्येक अर्जदाराशी चर्चा करून संबंधित अर्ज त्या त्या विभागाकडे निकाली काढण्यासाठी दिला. जनता दरबारात विद्युत, आरोग्य, शिक्षण, महसूल, वन, भुसंपादन, रस्ते वाहतूक, घरकुल अशा विविध विभागांबाबत अर्ज आले होते. मागील जनता दरबारात १९७ अर्ज दाखल झाले होते, यातील सर्वांना लेखी स्वरूपात प्रशासनाकडून लेखी उत्तरे देण्यात आली आहेत याबाबतची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली.