no images were found
शिवाजी विद्यापीठात भाषांतरकारांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि भारतीय अनुवाद साहित्य, भुवनेश्वर, ओडिसा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ व ३ नोव्हेंबर, २०२३ रोजी,‘भाषांतरकारांची राष्ट्रीय परिषद’ आयोजित केली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर, भाषाभवन सभागृहात विविध भारतीय भाषांतील भाषांतरकार यांच्या उपस्थितीत ही परिषद संपन्न होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन भारत सरकारच्या मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि ख्यातकीर्त लेखक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते व मा. कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. इफ्लू युनिव्हर्सिटी हैदराबादच्या माजी कुलगुरू, भाषांतरकार डॉ. माया पंडित या परिषदेचे बीजभाषण करणार आहेत. तसेच भारतीय अनुवाद साहित्य संस्थेचे सचिव सरत चंद्र आचार्य हे उपस्थित राहणार आहेत.
भाषांतर हा दोन भाषाच नाही तर दोन संस्कृतीतील दुवा असतो. भाषांतरामुळे नव्या माहितीचा, ज्ञानाचा मोठा साठा खुला होतो. भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशातील बहुभाषिक साहित्याच्या आविष्काराचे प्रभावी माध्यम म्हणून भाषांतराचे महत्त्व आहे. भुवनेश्वर येथील भारतीय अनुवाद साहित्य ही संस्था भारतीय भाषांतील दर्जेदार साहित्याचे भाषांतर व अनुवादाचे कार्य करीत आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अनुसरून भारतीय भाषांमधून नवी ग्रंथनिर्मिती हा उद्देश लक्षात घेऊन आयोजित केलेली ही परिषद भाषा व भाषांतर धोरणांसाठी पूरक ठरणारी आहे.
या दोन दिवसीय राष्ट्रीय भाषांतर परिषदेत विविध भारतीय भाषांमधील भाषांतरकार विविध विषयांवर विचार मांडतील. तसेच विविध भाषांमध्ये भाषांतर करणा-या लेखकांशी प्रत्यक्ष संवाद व चर्चादेखील करता येईल. या परिषदेस महाराष्ट्र, ओडिसा, आसाम, प. बंगाल, छत्तीसगढ, कर्नाटक या राज्यातील एकशे पन्नास भाषांतरकार उपस्थित राहणार आहेत. भाषा, साहित्य आणि भाषांतरविषयक अभ्यास व आस्था असणा-या सर्वांनी दि. २ व ३ नोव्हेंबर रोजी या परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले आहे.