
no images were found
वर्दीतल्या ‘बाप’माणसाची बदली, निरोपाला अलोट गर्दी
ठाणे : शिक्षकाच्या बदली अथवा निवृत्तीनंतर त्यांना निरोप देताना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे व्हिडिओ आपण अनेकदा पहिले असतील. पण एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीनंतर संपूर्ण पोलीस ठाण्यातील अधिकारी – कर्मचारी, परिसरातील नागरिक भावुक झाल्याचा हा कदाचित पहिलाच प्रसंग असेल, हा व्हिडिओ आहे ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील नारपोली पोलीस ठाण्याचा.
या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांची बदली झाली. बदलीनंतर मीरा – भाईंदर, वसई – विरार पोलीस आयुक्तालयात सहायक पोलीस आयुक्त म्हणून मदन बल्लाळ लवकरच रुजू होतील. मात्र नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना या पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे मदन बल्लाळ यांनी सांभाळून घेतले.
घरगुती अडचणी असो अथवा पोलीस ठाण्यातील कामाचा ताण आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीमागे बल्लाळ नेहमीच खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळेच आज त्यांच्या बदलीदरम्यान पोलीस ठाण्यातील प्रत्येकाच्याच डोळ्यात अश्रू तरळले.
सहकाऱ्यांचे आपल्याप्रती असलेले प्रेम आणि आपुलकी पाहून खुद्द मदन बल्लाळ ही काहीसे भावुक झाले. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या सहकाऱ्यांकडून असा निरोप समारंभ मिळणे, ही आजच्या काळात निश्चित दुर्मिळ गोष्ट आहे.