no images were found
बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भाजपा अध्यक्ष होता का? – उद्धव ठाकरे
ड्रग्ज तस्करीचे आरोप असलेल्या ललित पाटीलला मिळालेल्या राजकीय आश्रयावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटीलला २०२० मध्ये अटक झाली तेव्हा तो शिवसेनेचा नाशिक शहराध्यक्ष होता, असा आरोप केला. तसेच ललित पाटील शिवसेनेचा पदाधिकारी होता म्हणूनच त्याला तेव्हा सवलत मिळाली का? असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. ते शनिवारी मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “ललित पाटील प्रकरणात सत्य काय आहे हे सर्वांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर आमच्या अरविंद सावंत यांनीही उत्तर दिलं आहे. संजय राऊत आणि सुषमा अंधारेही बोलत आहेत. त्यामुळे फडणवीसांकडे प्रश्नांची उत्तरं नाहीत.”. फडणवीसांच्या म्हणण्यानुसार, अटक केली तेव्हा ललित पाटील शिवसेनेचा नाशिक शहराध्यक्ष होता. मात्र, असं म्हणणं म्हणजे बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भाजपा अध्यक्ष होता, असं म्हणण्यासारखं आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “ललित पाटीलला अटक झाली १०/११ डिसेंबर २०२० मध्ये. जेव्हा अटक झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी ललित पाटीलला नाशिकच्या शिवसेनेचं प्रमुख केलं होतं. आता आश्चर्य बघा की, गुन्हा मोठा होता आणि ललित पाटीलला अटक झाल्यानंतर १४ दिवसांचा पीसीआर (रिमांड) मिळाला. पीसीआर मिळाल्याबरोबर ते ससूनला दाखल झाले. तसेच पूर्ण १४ दिवस पीसीआरमध्ये ससूनमध्ये दाखल होते. यावेळी सरकारी पक्षाकडून न्यायालयात आम्ही आरोपीची चौकशी केली नसल्याचं अथवा त्यांचा आजार योग्य नसल्याचं सांगत अर्जही करण्यात आला नाही.