no images were found
शोभायात्रेत विविध क्षेत्रातील 600 हून अधिक महिलांच्या सहभागातून स्त्रीशक्तीचा जागर
कोल्हापूर : पारंपरिक पोशाख, कलादर्शन, बेटी बचाओ बेटी पढाओ, सामाजिक क्षेत्रातील महिलांचे योगदान यासह अनेक सामाजिक संदेश देत शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सवातील महिलांच्या शोभायात्रेत स्त्रीशक्तीचा जागर झाला. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 616 महिलांनी आज कोल्हापूरकर आणि जिल्ह्यात आलेल्या भाविक व पर्यटकांना सामाजिक संदेश देत आम्हीही कुठे कमी नाही असा जणू संदेशच दिला. सकाळी 9 वाजता दसरा चौकातून शोभायात्रेला सुरुवात झाली. पुढे भवानी मंडप, उमा टॉकीज, रेल्वे पूल, कावळा नाका ते दसरा चौक असा रॅलीचा प्रवास झाला.
पारंपरिक पोशाखातून शाही संस्कृतीचे दर्शन, नवदुर्गांच्या पेहरावातून स्त्रीशक्तीचे रुप, काळ्या कोटातील न्यायदेवतेचे अस्तित्व, कपाळाला मळवट भरलेली श्री अंबाबाई, दुचाकीवरुन निघालेली वाहतूक विभागातील नारी शक्ती आणि पोलीस भगिनी यांनी आज उत्साहाने शोभायात्रेत सहभाग घेतला होता. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी या शोभायात्रेतील सहभागातून त्यांनी केलेल्या कामाचे संदेश रुपात सादरीकरण केले. छत्रपती शाहू महाराज, त्यांच्या घराण्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या महिलांच्या वेशभूषेत काही कोल्हापूरकर महिलांनी सहभाग घेतला होता. महिला पत्रकार, डॉक्टर्स, नर्सिग स्टाफ, वकिल, निर्भया पथक, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, शासकीय अधिकारी जिल्हा परिषद, अंगणवाडी व आशासेविका, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, व्यावसायिका, माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षिका, बचत गटाच्या सदस्या, अग्निशमन दलात काम करणाऱ्या महिला, रिक्षा चालक, विद्यार्थिनींसह लगोरी फाउंडेशन, संस्कार शिदोरी गट, चित्रपट कला परंपरा, करवीर निवासिनी, महिला रिक्षा चालक गटाबरोबरच अन्य महिला विविध गटांसह रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. अनेक क्षेत्रातील महिलांनी शोभायात्रेत सहभाग नोंदवून शाही दसरा कोल्हापूरचा यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.