no images were found
पर्यटकांना दसरा भेट, कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन मोबाईल एप्लीकेशनचे उद्घाटन
कोल्हापूर : राज्यासह देशातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी iOS व Android चे बीटा वर्जन मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे पर्यटकांची वेळ व पैशाची बचत होऊन पर्यटनदृष्टय़ा योग्य सुनियोजन करता येणार आहे. परिणामी पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. शासनाने हे ॲप उपलब्ध करून देऊन पर्यटकांना दसरा भेट दिली आहे. ह्या मोबाईल एप्लीकेशनचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दिनांक 15 ऑक्टोबर , सायंकाळी ५.०० वाजता होत आहे. यानंतर हे ॲप सर्वांसाठी मोबाईल मध्ये घेता येणार आहे.
कोल्हापूर जिल्हा हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे. सह्याद्रीच्या रांगा, गड – किल्ले, धरणे, नद्या, पुरातन मंदिरे असा विविधतेने नटला आहे. येथील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी राज्य, देशासह विदेशी पर्यटकही आपली हजेरी लावतात. पर्यटनाच्या माध्यमातून उद्योग निर्मिती करीत इथले नाविन्य जगाच्या नकाशावर आणण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी iOS व Android मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. सदर मोबाईल ॲप्लिकेशन जिल्ह्यातील, व जिल्ह्याबाहेरील पर्यटकांना प्रवासाचा कार्यक्रम तयार करण्यात ,भेटी देऊ इच्छित असलेल्या प्रेक्षणीय स्थळांचा प्रवास व पर्यटनाचे इच्छित नियोजन पूर्ण करण्यात आधुनिक तंत्रज्ञाना द्वारे गतिशील पणे मदत करणार आहे. पर्यटकांना त्यांच्या रियल टाईम लोकेशन आधारे जवळची विशेष पर्यटन स्थळे, हॉटेल्स, ट्रॅव्हल एजंट ,प्रमुख पर्यटन स्थळांची यादी, मार्गदर्शकांची यादी दर्शवित ताज्या बातम्या आणि घटनांबाबत मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये एकत्रित माहिती मिळणार आहे. तसेच ॲप्लिकेशन वापरकर्त्यांच्या संकलित माहिती द्वारे जिल्ह्याची एकंदरीत पर्यटनाची सर्व कशी सांख्यिकी तयार करणे शक्य होणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिरे, गड किल्ले, संग्रहालय, धरण, ऍग्रो टुरिझम, अभयारण्य, एडवेंचर स्पोर्ट्स, पदभ्रमंती मार्ग अशी सर्व माहिती एकत्रित iOS व Android मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये पर्यटकांना मिळणार आहे. यामुळे हे ॲप्लिकेशन पर्यटकांना एक पर्वणीच ठरणार असून या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.