
no images were found
जिथे समस्या, तिथे उन्नतीच्या शक्यता अधिक: कुलगुरू डॉ. शिर्के
कोल्हापूर : ज्या प्रदेशात प्रश्न आहेत, तिथे उन्नतीच्या शक्यता अधिक निर्माण होतात. कारण त्या प्रश्नांची, समस्यांची सोडवणूक हीच आपल्याला पावलापावलाने प्रगतीच्या दिशेने घेऊन जात असते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल (दि. १३) बिदाल (ता. माण, जि. सातारा) येथे केले.
पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंवर्धन आणि वृक्षलागवडीची चळवळ यशस्वी करून दाखविल्याने महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे स्थान अधोरेखित केलेल्या बिदाल येथील या कामाची पाहणी करण्यासाठी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी काल या गावाला भेट दिली. त्यावेळी येथील ग्रामसचिवालयात ग्रामस्थ व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
बिदाल या गावाने राज्याला आणि देशाला वर्ग-१ आणि २ चे अनेक वरिष्ठ अधिकारी दिले आहेत, याचा संदर्भ घेऊन बोलताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ज्याठिकाणी साधनसुविधांची वानवा असते, अशा ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातूनच आपल्याला प्रगती साधता येऊ शकते, याच्या जाणीवा प्रखर असतात. त्यामुळे येथील युवकांनी ही जाणीव मनात ठेवून अभ्यास केला आणि विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळविले. मात्र, त्यांनी आपल्या गावाकडे पाठ फिरविली नाही, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यामुळे गावच्या विकासकामांमध्ये त्यांचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे योगदान असल्याचे दिसते.
बिदाल या गावाने जलसंवर्धन व १५ लाखांहून अधिक वृक्षलागवडीचे केलेले काम प्रशंसनीय असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, लोकसहभागातूनच आपल्याला विकास साधता येऊ शकतो, याचे बिदाल हे सर्वदूर उदाहरण ठरले आहे. आणि ही विकासकामे करीत असताना कोणतेही मतभेद आपण त्या कामांच्या आड येऊ देत नाही, हे फार महत्त्वाचे आहे. हा एकोपा गावाने असाच जपावा आणि प्रगतीपथावर वाटचाल करीत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी बिदालमधील लोकसहभागातून साकारलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. त्याचप्रमाणे लोकसहभागातून उभारलेल्या ग्रामसचिवालय इमारतीमधील विविध सुविधांचीही पाहणी केली. येथील सानेगुरूजी ग्रंथालयासाठी शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाळकृष्ण लिखित व डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘महान शिवाजी’ या ग्रंथाच्या प्रती कुलगुरूंनी सरपंच प्रमोद जगदाळे यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने कुलगुरूंचा पारंपरिक घोंगडी व पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह शिवाभाऊ जगदाळे, प्रताप भोसले, सुरेश जगदाळे, सुरेशभाऊ जगदाळे, हणमंतराव जगदाळे, रावसाहेब देशमुख, किशोर इंगवले, शंकर जगदाळे, सुशांत ढोक, अमित कुचेकर, विजय खरात, श्री. अडसूळ, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि नव महाराष्ट्र विद्यामंदिराचे प्राचार्य श्री. शिंदे आणि विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.