no images were found
फडणवीसांच्या प्रयत्नामुळे तब्बल २१ दिवस सुरू असेललं ओबीसींचं उपोषण मागे
चंद्रपूर : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर मराठ्यांचा ओबीसीत समावेश नको, अशी भूमिका मांडत इतर काही प्रलंबित मागण्यांसाठी चंद्रपुरात मागील २१ दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं.
गेल्या काही दिवसांत टोंगे यांची प्रकृती खालावली होती. टोंगे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना मागील आठवड्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागातही दाखल करण्यात आले होते. त्यामुळे सरकार ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने आता अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार समाजबांधवांनी जाहीर केला होता.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. मात्र हे आरक्षण दिलं जात असताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही. तसंच ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे. ओबीसींसाठी सुरू असलेल्या विविध योजनांसाठी सरकारकडून भरीव आर्थिक मदत केली जाईल,’ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.