no images were found
प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे यांना अकॅडमीक एक्सलन्स (प्रिन्सिपल)अवॉर्ड
कसबा बावडा / वार्ताहर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडाचे प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे यांना ‘अकॅडमीक एक्सलन्स (प्रिन्सिपल)’ अवार्डने सन्मानित करण्यात आले. ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स (इंडिया)’च्या वतीने अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.
‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स’या संस्थेच्यावतीने नवी मुंबई येथे 15 सप्टेंबर रोजी एनएमएलसी-एफसीआरआयटी अवॉर्ड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातील निवडक व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स’चे अध्यक्ष डॉ. कृष्णराव गोडबोले, डॉ. निलेश देशमुख, इंजी. संजय आर बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या 40 वर्षापासून गुणवत्ता पूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डॉ. संतोषकुमार चेडे प्राचार्य पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याकडे ३१ वर्षाचा अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांचे शंभरहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या प्राचार्यपदाच्या काळात महाविद्यालयाला स्वायत्तता मिळाली असून एनबीए मानांकन मिळाले आहे. सेंटर ऑफ इंव्हेंशन, इनोव्हेशन अँड इंकिब्यूशन , ए आय सी टी ई आयडिया लॅब आदी सुविधा मिळाल्या आहेत. संशोधन कार्य व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘अकॅडमीक एक्सलन्स (प्रिन्सिपल)’ अवार्डने ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स’चे अध्यक्ष डॉ. कृष्णराव गोडबोले, यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात महाविद्यालयाचे केमिकल विभाग प्रमुख डॉ. के. टी. जाधव यांचा ‘अकॅडमी एक्सलन्स (हेड ऑफ द डिपार्टमेंट)’ अवार्डने सन्मान करण्यात आला.
या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी डॉ. चेडे आणि डॉ. जाधव यांचे अभिनदन केले आहे.
नवी मुंबई: प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे यांना ‘अकॅडमीक एक्सलन्स प्रिन्सिपल’ अवार्डने सन्मानित करताना ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स’चे अध्यक्ष डॉ. कृष्णराव गोडबोले.