no images were found
“ओझोन डे” निमित्त पर्यावरणाचे जतन व पर्यावरण संवर्धन या विषयावरील चित्रकला स्पर्धा
कोल्हापूर : राष्ट्रीय स्वच्छ हवा योजना (NCAP) अंतर्गत हवेत होणारे प्रदूषण टाळण्यासाठी जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी “ओझोन डे” चे औचित्य साधून महानगरपालिका परिसरातील वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व शालेय शिक्षण स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणाचे जतन व पर्यावरण संवर्धन या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चित्रकला स्पर्धांचे नियोजन महाविद्यालयीन स्तरावर प्राचार्य, स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांचे स्तरावर करण्यात आले आहे. तर माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शालेय स्तरावरील नियोजन महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत करण्यात येणार आहे. हि स्पर्धा राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम समितीचे सदस्य महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने व पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे.
यामध्ये महापालिकेच्यावतीने वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील चित्रकला स्पर्धातील दोन्ही गटातील उत्कृष्ट चित्रकृतींना पहिल्या 3 क्रमांकासाठी अनुक्रमे रुपये 10,001/-, रुपये 7,001/-, रुपये 5,001/- अशी रोख रक्कम व वृक्षांचे रोपे देवून गौरंवाकित करण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट 5 चित्रकृतीना उत्तेजनार्थ पारितोषिकही देण्यात येणार आहे. यासाठी प्रमाणपत्र व रुपये 1001/- रोख अशी रक्कम देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण स्तरावरील उत्कृष्ट पहिल्या 3 चित्रकृतींना अनुक्रमे रुपये 5,001/-, रुपये 3,001/- व रुपये 2,001/- अशी रोख रक्कम, प्रमाणपत्र व रोप देऊन गौरवण्यात येणार आहे. तर 5 उत्कृष्ट चित्रकृतींना प्रोत्साहन पर रुपये 1,001/- व प्रमाणपत्र असे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या स्पर्धांच्या निवडीसाठी 5 सदस्यांची स्वतंत्र निवड समिती गठीत करण्यात आली असून त्यामध्ये कला शिक्षक, राष्ट्रीय स्वच्छ हवा योजने अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीतील पर्यावरण तज्ञ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
या स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या चित्रकृतींना महानगरपालिकेच्या परिसरातील विविध कुंपण भिंती, उड्डाणपूल, शाळेच्या इमारतींच्या भिंती अशा उपलब्ध ठिकाणी चित्रित करण्याचे प्रस्तावित आहे. स्पर्धेच्या आयोजनानंतर काही दिवसातच स्पर्धेचा निकाल जाहीर करून पुरस्कार प्रदान कार्यक्रम स्वतंत्रपणे आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे.