no images were found
“न्यू वुमन्स काॅलेज ऑफ फार्मसी शाखेचे थाटात उद्घाटन
कोल्हापूर ( प्रतिनिधी) :श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेची अकरावी विद्याशाखा म्हणून ‘न्यू वुमन्स काॅलेज ऑफ फार्मसी’ या शाखेचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. न्यू वुमंस कॉ लेज ऑफ फार्मसी अग्रगण्य बनेल, असे उदगार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी याप्रसंगी काढले .ते पुढे म्हणाले, “आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ त्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी लावली. या संस्थेचे पदाधिकारी बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद जपून कार्यरत आहेत. आज या परिसरात मुलींचे काॅलेज सुरू होत आहे, हे पाहून आनंद झाला. अलिकडच्या काळातील विविध अडचणींवर मात करत संस्था पुढे जात आहे, याचा अभिमान वाटतो. लवकरच हे काॅलेज अग्रगण्य होईल, असा विश्वास वाटतो असे म्हणत त्यांनी सर्वांना शुभेच्छा”दिल्या.
प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार जयश्री जाधव होत्या. त्या म्हणाल्या, “माझ्या राज्यातील जनता शिकून शहाणी झाली पाहिजे, असे म्हणत राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाची दारे सामान्य व वंचित लोकांसाठी खुली केली. या संस्थेचा लौकिक वाढता राहो, यासाठी त्यांनीही शुभेच्छा”दिल्या.
संस्थेचे विकास अधिकारी डाॅ. संजय दाभोळे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, “२५ एप्रिल २०२२ ला न्यू पॉलिटेक्निकने आयोजित केलेल्या राजर्षी शाहू स्मृती रॅलीचे उद्घाटन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले होते. ती रॅली न्यू पॉलिटेक्निकसाठी सकारात्मक बदलाची ठरली आणि न्यू पाॅलिटेक्नीकचा वेगाने विस्तार झाला. हे फार्मसी काॅलेज माॅड्यूलर लॅब, अद्ययावत ग्रंथालय आदी दर्जेदार सुविधांनी परिपूर्ण असल्याने फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने या काॅलेजला कोणत्याही त्रुटीविना मान्यता दिली. भविष्यात फार्म. डी., बी. टेक. इंजिनिअरींग, बी. एस्सी नर्सिंग, मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.”
हुतात्मा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा व संचालक वैभव नायकवडी मनोगतात म्हणाले, “राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या माध्यमातून पुरोगामित्व टिकवलं, वाढवलं. आपण सर्वसामान्यांचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहीलो, तरच आपल्याला राजर्षींचे नांव घेण्याचा अधिकार आहे. इथं ज्या-ज्या वेळी येतो, त्या प्रत्येक वेळी इथे खाल्लेल्या भाकरीतून उतराई होण्याचे दडपण असते.”
चेअरमन के. जी. पाटील म्हणाले, “कोविड काळानंतर वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार होण्याची गरज वाढली आहे. फार्मसी शिक्षणाकडे मुलींचा असलेला विशेष ओढा विचारात घेवून आणि संस्थेच्या या शिवाजी पेठेतील प्रांगणात मुलींचे होस्टेल असल्याने इथे मुलींसाठीचे फार्मसी काॅलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला. राजर्षिंच्या विचारांचा वारसा जपत आम्ही सर्व पदाधिकारी काम करत आहोत.”
संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे म्हणाले, “शाहू महाराज साहेबांच्या पवित्र हस्ते या काॅलेजचे उद्घाटन होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. त्यामुळे या काॅलेजची भरभराट होणार हे निश्चित आहे.संचालक विनय पाटील यांनी पाहुण्यांची आणि संस्थेची ओळख उपस्थितांना करून दिली. शैक्षणिक क्षेत्रात संस्था विस्तार करत असताना छत्रपती शाहू महाराज साहेब यांचे आशिर्वाद संस्थेस मिळत आहेत, हे आमच्यासाठी भाग्याचे आहे, असे ते म्हणाले.
यावेळी चेअरमन के. जी. पाटील यांचा ७७ वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यातआला.कार्यक्रमाच्या सुरूवातीस शाहीर दिलीप सावंत व शाहीर तृप्ती सावंत यांनी पोवाडा सादर केला. त्याचबरोबर या काॅलेजच्या उभारणीमध्ये ज्या स्टाफचे योगदान आहे, त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे खजाननीस वाय. एस. चव्हाण, संचालक, सेक्रेटरी, सर्व शाखांचे प्रमुख, शिक्षक व स्टाफ उपस्थित होते.आभारप्रदर्शन व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार यांनी केले. सूत्रसंचालन डाॅ. मनिषा नायकवडी यांनी केले.