no images were found
जिल्ह्यातील भाजप संपवण्याचा प्रयत्न :- आजऱ्यातील भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकारी यांचं मत
कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप संपवण्याचा प्रयत्न नेतेमंडळींनी केला, असा घरचा आहेर आजऱ्यातील भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिला. भाजपमधील जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांच्या वादाचे पडसाद तालुक्यात उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर जुन्या ज्येष्ठ निष्ठावंतानी येथे पत्रकार परिषद घेतली. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, अरुण देसाई, प्रा. सुधीर मुंज, महादेव टोपले, मलिककुमार बुरुड, माजी नगरसेवक धनाजी पारपोलकर, नाथ देसाई यांनी पत्रकार परिषदेत मत मांडले.
प्रा. मुंज म्हणाले, ‘गेली चाळीस वर्ष पक्षाचे काम करीत आहे. पदाची अपेक्षा ठेवली नाही. पक्षाचे आदेश आम्ही कायम पाळले; पण लाभाची पदे मात्र तालुक्यातील अन्य मंडळींना दिली. दहा वर्षापासून आमच्यावर अन्याय होत असून घुसमट सुरू होती. पदाधिकारी बदलामध्ये नेत्यांनी कडेलोट केल्याने पक्षाचे काम थांबवले.’ सुधीर कुंभार म्हणाले, ‘पक्ष वाढविण्यापेक्षा तालुक्यात गट वाढविण्यात पक्षातील काही जणांनी भर दिला. सध्या पक्षात आलेल्या आयारामांकडून पक्ष हायजॅक करण्याचे काम सुरु आहे.’
पक्ष वाढविण्यासाठी इतरांना पक्षात घेणे मान्य आहे. पण मुळात पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावंतावर अन्याय करणे हे चुकीचे आहे. मागील दहा वर्षांपासून नेतेमंडळींकडून आजऱ्यातील कार्यकर्त्यांची मुस्कुटदाबी सुरू आहे. लाभाची पदे मात्र पक्षात नव्याने येणाऱ्यांना मिळत आहेत. पदाधिकारी बदलामध्ये कडेलोट झाल्याने पक्षाचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणाचा ‘चंदगडमध्ये एकच उमेदवार दिला असता तर शिवाजी पाटलांचा पराभव झाला नसता; पण जिल्ह्याच्या नेतृत्वाने अनेकांना उभे रहा, असा कानमंत्र दिला. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या पाटील यांचा पराभव झाला. याच्या पाठीमागे कोण होते?’ असा सवाल अरुण देसाई यांनी उपस्थित केला.