no images were found
भारत-जपान यांच्यात विविध क्षेत्रांत सहकार्यवृद्धी आवश्यक: प्रा. योशिरो अझुमा
कोल्हापूर : बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये भारत आणि जपान यांनी शिक्षण, संशोधनासह विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहकार्यवृद्धी करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जपानच्या टोक्यो येथील सोफिया विद्यापीठाचे वरिष्ठ संशोधक प्रा. योशिरो अझुमा यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात आयोजित १३व्या भारत-जपान विज्ञान व तंत्रज्ञान कॉन्क्लेव्हअंतर्गत आंतरराष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान परिषदेच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी प्रा. अझुमा यांचे ‘जपान आणि भारतामधील वैज्ञानिक संशोधनाची संस्कृती व शिक्षण: आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन व समकालीन संधी’ या विषयावर खुले व्याख्यान झाले. वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
प्रा. अझुमा म्हणाले, जपान आणि भारत यांची सद्यस्थिती बरीचशी परस्परपूरक स्वरुपाची आहे. दोन्ही देशांमध्ये संधींचे अवकाश अत्यंत व्यापक आहे. मनुष्यबळाच्या बाबतीत जपान तोकडा पडतो. भारत मात्र मनुष्यबळाच्या बाबतीत अत्यंत समृद्ध आहे. येथील शिक्षण, संशोधनाचा त्याचप्रमाणे सोयीसुविधांचा दर्जाही वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांमध्ये शिक्षक, संशोधक, विद्यार्थी यांनी परस्परांच्या देशांमधील उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्यासाठी सुसज्ज व्हावे. खरे तर, भारताला जपानची जितकी गरज आहे, त्याहूनही अधिक जपानला भारताची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.