no images were found
सर्वांगीण धोरणात्मक व गुणात्मक जिल्हा विकास आराखडा तयार करा – राहुल रेखावार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण धोरणात्मक विकास आराखडा तयार करण्यासाठी व त्याला गुणात्मक सहाय्य देण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली असून क्षेत्रनिहाय सखोल अभ्यास व समन्वयाकरिता उपसमित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या उपसमित्यांमार्फत जिल्ह्याचा सर्वांगीण धोरणात्मक व गुणात्मक जिल्हा विकास आराखडा तयार करा, अशा सूचना जिल्हास्तरीय कार्यशाळेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी उपसमितीमधील शासकीय सदस्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यशाळेमध्ये मंचावर जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, जिल्हा विकास आराखड्याचे सीकॉमचे सल्लागार अरुण धोंगडे, सहाय्यक नियोजन अधिकारी श्री.सुतार, जिल्हा सांख्यिकी अधिकारी सायली देवस्थळे, महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी, सीएम फेलो अवनी डोणगावकर व आंचल बागडे आदी उपस्थित होते.
विकसित भारतासाठी महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याकरता विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करुन सन 2023-24 पासून जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये जिल्हास्तरीय क्षेत्र उपसमित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये कृषी व संलग्न सेवा, उद्योग व व्यापार, शिक्षण व कौशल्य विकास, हस्तकला विकास, माध्यमे व मनोरंजन, रियल इस्टेट व सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पर्यटन व संबंधित अशा वेगवेगळ्या क्षेत्र उपसमितींची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांमध्ये संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती व संस्थांचा समावेशही करण्यात आला आहे. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अनुभव व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग जिल्हा विकास आराखडा तयार करताना शासनाकडून करुन घेण्यात येत आहे. हा विकास आराखडा तयार करताना प्रत्येक क्षेत्रातील बलस्थाने, संधी, कमकुवत स्थाने तसेच धोके ओळखून त्यांचा सविस्तर समावेश आराखड्यात करण्यात येत आहे.
या कार्यशाळेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कृषी, उद्योग व सेवा या क्षेत्रांमधील प्राधान्यक्रम ठरवून प्रत्येक घटकासाठी धोरणात्मक व गुणात्मक तपशील नमूद करुन अशासकीय तज्ज्ञ व्यक्ती, संस्थांकडून माहिती एकत्रित करुन त्यांचे योगदान घेऊन चांगल्या बाबींचा समावेश करा, असे निर्देश उपस्थित सदस्यांना दिले.
जिल्हा विकास आराखड्यासंबंधित राज्यस्तरीय सल्लागार अरुण धोंगडे यांनी जिल्हा विकास आराखडा निर्मितीबाबतचे सादरीकरण उपस्थितांसमोर केले. यामध्ये केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे सुद्धा साध्य करण्याचा मानस आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्य ध्येय ‘विकसित भारतासाठी राज्याची अर्थव्यवस्था’ असे असून सन 2027 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर, 2037 पर्यंत 2.5 ट्रिलियन डॉलर व 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचे नियोजन आहे. यामध्ये प्राथमिक क्षेत्रात कृषी संबंधित उद्योग व्यवसाय मोडतात तसेच द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग व्यवसायाशी क्षेत्र निगडित आहे तर तृतीय क्षेत्रामध्ये सेवा मोडतात. या क्षेत्रानुसार राज्यात कोल्हापूर जिल्हा प्राथमिक क्षेत्रात नवव्या स्थानावर आहे. यातील द्वितीय क्षेत्रामध्ये जिल्ह्याचा सहावा व तृतीय क्षेत्रातही सहावा क्रमांक लागतो. यातील जिल्ह्याचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी या जिल्हा विकास आराखड्यातून नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये एकूण देशांतर्गत जिल्ह्याचे उत्पादन प्राथमिक क्षेत्रामध्ये 13383 कोटी, द्वितीय क्षेत्रात 20034 कोटी तर तृतीय क्षेत्रात 49374 कोटी असे आहे.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी अर्थसंकल्प कार्यक्रम आणि खर्चाच्या पारंपरिक संकल्पनेच्या पलिकडे जाऊन जिल्हा गुंतवणुकीचे केंद्र करुन देण्यासाठी जिल्ह्याची नवीन ओळख निर्माण करुया असे सांगितले. ते म्हणाले, विविध शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी आवश्यक त्या कार्यप्रणालीचा या आराखड्यात समावेश अंतर्भूत असणे आवश्यक आहे.