no images were found
जिल्ह्यातील गोवंशीय पशुधनाचे बाजार बंद – राहुल रेखावार
कोल्हापूर : प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार लम्पी चर्मरोगाचा (LSD- Lumpy Skin Disease) अनुसूचित रोग म्हणून समावेश करण्यात आला आहे. या रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
बाधित जनावरांपासून निरोगी जनावरांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. हा रोग सांसर्गिक असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये, म्हणून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
१) गोजातीय प्रजातीच्या सर्व गुरांची, ज्याठिकाणी ते पाळले/ठेवले जातात त्याठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्याक्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई आहे.
२) गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतेही जिवंत किंवा मृत गुरे, गोजातीय प्रजातीच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई आहे. रोगग्रस्त मृत जनावराची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावावी .
३) गोजातीय प्रजातीच्या गुरांचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडण्यास मनाई आहे. या विषयीच्या या आधी दिलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत.
४) जिल्ह्यामधील बाजार पेठेत, जत्रेत किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गोजातीय प्रजातीतील प्राण्यांना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करण्यास मनाई आहे.
५ )नियंत्रित क्षेत्राबाहेरील कोणतेही जनावर लम्पी चर्म रोगाच्या लसीकरणाचे एप्रिल २०२३ किंवा त्यानंतरचे प्रमाणपत्र असल्याशिवाय आणि लस घेऊन किमान २८ दिवस झालेले असल्याशिवाय नियंत्रित क्षेत्रात आणण्यास बंदी आहे.
६) रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये व रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामधून ऑनलाइन पद्धतीने होणारी खरेदी विक्री व प्रत्यक्ष वाहतूक करण्यास मनाई आहे.
७) बाधित परिसरात स्वच्छता ठेऊन व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करावे व रोग प्रसारास कारणीभूत असलेल्या डास माश्या गोचीड इत्यादींच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करावी.
८) लम्पी चर्मरोगाचा विषाणू विर्यामधुनही बाहेर पडत असल्याने विर्यमात्रा बनविणाऱ्या संस्थांमार्फत होणारे विर्य संकलन थांबवावे व वळूंची चाचणी करुन नकारार्थी आलेल्या वळूंचे विर्य संकलन करणे किंवा नैसर्गिक संयोगाकरिता वापर करावा.
९) लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा व महानगरपालिका यांच्यामार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे तसेच बाधित पशुधनाची काळजी घ्यावी व कीटकनाशक फवारणी मोहीम स्वरुपात राबविण्यात यावी.
१०) कायद्याची सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ति, संस्था प्रतिनिधींविरुद्ध नियमांनुसार गुन्हा दाखल करणे तसेच कारवाई प्रस्तावित करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.