
no images were found
शिवाजी विद्यापीठातर्फे स्टार्टअप स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर. (प्रतिनिधी ) : उदयोन्मुख उद्योजकांना अधिकाधिक प्रोत्साहित करून स्टार्टअप्सना नवरोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरता पाठबळ देण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूश इनोव्हेशन कौन्सिल तर्फे इंटर-इन्स्टिट्यूशनल स्टार्टअप स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया माध्यमातून नोंदणीकृत असलेले स्टार्टअप या स्पर्धेकरिता भाग घेण्यास पात्र आहेत. टेक्नॉलॉजी व आयटी, हेल्थकेअर व बायोटेक्नॉलॉजी, सोशल इम्पॅक्ट, एन्व्हायरमेंट व सस्टेनेबिलिटी, शिक्षण व एज्युटेक, शेती व शेती तंत्रज्ञान, कंज्यूमर प्रॉडक्ट्स आणि सर्विसेस अशा विविध क्षेत्रांमधील स्टार्टअप्सना या स्पर्धेमध्ये भाग घेता येईल.
सदर स्पर्धेत भाग घेण्याकरिता शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहितीपत्रक उपलब्ध असून ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून आपल्या नोंदणीकृत स्टार्टअपची अधिकृत माहिती भरून यात सहभागी होता येईल. सहभागी स्टार्टअपचे तज्ञ परीक्षकांच्या मार्फत बिजनेस प्लॅन व डेमोस्ट्रेशनच्या माध्यमातून मूल्यांकन होईल. प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे रुपये 5000/-, 3000/- व 2000/– चे रोख पारितोषिक तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सहभागी होण्याकरिता रजिस्ट्रेशनचे अंतिम तारीख दिनांक 26 ऑगस्ट 2023 आहे. स्टार्टअपचे परीक्षण व मूल्यांकन दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित करण्यात आले आहे.
स्टार्टअपकरिता आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा (डॉ.) एस. एन. सपली यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता स्पर्धा समन्वयक व इनोव्हेशन अँबॅसिडर प्रा. हर्षवर्धन पंडित यांच्याशी तंत्रज्ञान अधिविभाग येथे संपर्क साधावा.
सदर कार्यक्रमाचे आयोजन इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल, शिवाजी युनिव्हर्सिटी सेंटर फॉर इनोव्हेशन इंक्युबॅशन अँड लिंकेजेस तसेच एस. यु. के. रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.